॥ रामरक्षा आणि मी ॥ धर्म अध्यात्म

Share This News

एका गावामधे एक श्रीमंत परिवार रहात होता पण जणु काही दृष्ट लागावी तशी बघता बघता ह्या सधन परिवाराची घसरण सुरू झाली. एकदा गावात आलेल्या नव्या साधू महाराजांची ख्याती ऐकून ह्या घरातील मोठी स्त्री त्यांच्याकडे गेली. आणि परत चांगले दिवस यावेत ह्यासाठी काही उपाय विचारू लागली. साधूने घरातील सर्व माणसांची माहिती विचारून घेतली आणि थोडा विचार करून त्याच्या झोळीतून धूपाची एक पुडी काढली आणि म्हणाला, “ रोज ह्यातील धूप धूपदाणीत जाळून दिवसातून तिनदा सकाळ, दुपार, संध्याकाळ घराच्या कानाकोपर्‍यातून फिरवत जा. हे काम मात्र तूच केले पाहिजेस. घरातल्या बाकी कोणालाही हे काम सांगता कामा नये.

बाई तसे करू लागल्या आणि बघता बघता काही महिन्यांमधेच पूर्वीचे चांगले दिवस येऊ लागले. पण बाईंकडचा धूप संपत आल्याने मोठ्या काळजीने बाईंनी साधूकडे धाव घेतली. साधू हसत म्हणाला, “धूपाचं काम संपलं. अहो साधा धूप होता तो. जसजशी तुमची श्रीमंती वाढत गेली तशी तुम्ही घर सोडून बाहेर पार्ट्यांना, भिशीला, शॉपिंगला मैत्रिणींसोबत पिकनिकांना/सहलीला बाहेर जायला लागला. घरातल्यांवर असलेला तुमचा वचक संपला. नोकर चाकर जे मिळेल ते पळवायला लागले. मुलेही नोकरांच्या संगतीत बिघडून वाईट मार्गाला लागली. घरामधे तुम्हाला धूप फिरवायला सागतांना माझा उद्देश तुम्ही तिन्ही त्रिकाळ घरात लक्ष घाला असा होता. घरात धूप फिरवायच्या नेमामुळे तुम्ही बाहेरच्या पार्ट्या, सिनेमे, पिकनिका, भिशा सर्व सोडून घरात परत नव्याने लक्ष देऊ लागला. आणि उद्देश सफळ झाला.

धूप फिरवायच्या निमित्ताने तिन्ही त्रिकाळ कोपर्‍या कोपर्‍यातून फिरतांना तुम्हाला नोकर काय करताएत, कामं न करता चटोरगिरी तर करत नाहीत? मुल काय करताएत? घरातील जावा, दीर ह्यांनी काय आरंभलय? हे सर्व दिसायला लागलं. प्रत्येकवेळेला तुम्ही त्यांना हे काय चाललय?' म्हणून टोकायला लागलात. तिजोरीवरची तुमची पक्कड घट्ट झाली. तुमचीच बाहेर चाललेली संपत्ती तुम्हाला दिसायला लागली. आता धूपाचं प्रयोजन संपलं. मी जरबाई तुम्ही बाहेरची मौज मजा सोडा आणि घरी लक्ष द्या’ असं परखडपणे सांगितलं असत तर तुम्ही माझ्यावर स्त्री स्वातंत्र्याचा बडगा उगारला असता.”

मला बाळ झाल्यावर असाच एक धूप माझ्या आज्जीने माझ्या हाती दिला होता. म्हणाली, “बाळाला मांडीवर घेऊन रोज रामरक्षा म्हणत जा हो. बाळाला दृष्टबिष्ट लागणार नाही.” माझ्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या विज्ञानाधिष्ठित मेंदूलाही तिच्या निष्पाप डोळ्यांकडे पाहून हो म्हणाव लागलं. बाळाला मांडीवर घेऊन रोज रामरक्षा म्हणतांना काही दिवसांनी रामरक्षेमागे दडलेलं एक सुंदर गुपित माझ्या लक्षात येऊ लागलं. रामरक्षेमधे रामाची अनेक नावं आहेत ही त्याची गुणविशेषणं आहेत. रामाच्या उत्तमोत्तम, श्रेष्ठ अशा गुणांची, पराक्रमांची स्फुरण देणारी गाथा मनात तेवत ठेवणारी आहेत. प्रत्येक माणसाला उभारी देणारी आहेत. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव एका एका नावासोबत जोडून त्या त्या अवयवाचे रामाने रक्षण करावे असे बुधकौशिक ऋषी म्हणतात. म्हणजे शरीराचा एकएक अवयव एका एका दिव्य गुणाला जोडून सुश्रुंखलीत केला आहे. अनुस्यूत केला आहे. ही अवयव आणि गुणांची सांगड मोठी विलोभनीय आहे.

बाळाला मांडीवर घेऊन हे म्हणतांना बाळासोबत खेळही होईल म्हणून मी शिरो मे राघवः पातु' ( राघव माझ्या डोक्याचे रक्षण करो ) असं म्हणतांना बाळाच्या जावळामधून बोटं फिरवत असे. बाळाला अंघोळ घालतांना कधिकधि त्याच्या केसात चिकटून राहिलेले डाळीचे पीठ सावकाश केसातून सोडवत असे.भालं दशरथात्मजः’ (कपाळाचे रक्षण दशरथपुत्र करो) म्हणतांना त्याच्या नाजुकशा कपाळावर माझी बोटं टेकवत असे. आणि हे काय? बाळाला ताप आहे?हे मला कळत असे. भुजौ भग्नेशकार्मुकः म्हणतांना त्यांच्या दंडावरच्या BCG कडे माझे लक्ष असे. पुढचा पोलिओ डोस कधि द्यायचा ह्याची मनात उजळणी होत असे. पादौ बिभीषणः पातु म्हणून पाय बघतांना बाळाच्या पायावर रॅश कधी आला? हे मला लगेच दिसत असे कण्ठम् भरत वन्दितः म्हणतांना गळ्याभोवती हे टोपडं काचतय हं! हे लक्षात येई. हृदयं जामदग्न्यजित् म्हणतांना त्याच्या छातीवर ठेवलेल्या हाताला ठक् ठक् ठक् ठक् ठोक्यांच्या लयीचा परिचय होत गेला. मध्यं पातु खरध्वंसी म्हणतांना बाळाच्या पोटावर ओठ टेकवून फुर्रऽऽर्र् करायची बाळाला इतकी सवय झाली की मध्यं शब्द यायच्या आधीच अंग घुसळत ते खुदखुदु लागे.

बाळाच्या त्या त्या अवयवाला हात लावतांना त्याला गम्मत वाटून हसू येत असे. आणि आई आपल्याशी खेळत आहे, बोलत आहे ते लक्षपूर्वक ते ऐकत असे. आमची घरे वैयक्तिक कमी आणि सार्वजनिकच जास्त असल्याने सतत लोकांचे जाणे येणे सुरू असे. बाळ सर्वांकडे फिरत असे. पण पातु रामोऽखिलं वपुः। म्हणतांना किंवा बाळ मांडिवर आल्या आल्या मी म्हणू लागले, “कोणी घेतलं होतं बाळाला? सिगारेटचा वास का येतोय त्याच्या अंगड्याला? त्या व्यक्तीला शोधून परत बिड्या न फुंकण्याची तंबी देत असे. त्याच्या अंगावरचा लहानसा ओरखाडा पाहून बाळापासून माझ्यापासून घरातल्या सर्वांची नखे तपासली जाऊ लागली. बाळासोबतच्या रामरक्षेच्या ह्या सात मिनिटात माझा रोजचा बाळाचा हेल्थचेक पूर्ण होत असे. हा preventive medical checkup बाळापुरता मर्यादित न राहता, घरातल्यांच्याही वाईट सवयींवर लगाम लावत असे. सर्वांनाच बूट चपला काढून नळावर हात पाय धुवून मगच घरात प्रवेश मिळत असे. बाळाच्या पोटाला चावलेला डास पाहून मीही माझा आळशीपणा सोडून मच्छरदाणी लावत असे.

बाळही आपल्या अवयवांची नावं अनुभवण्याच्या खेळासाठी संध्याकाळी वाट बघत असे. आईच्या मांडीवरचा बाळ रांगू लागला तरी कौसल्येयो दृश्यौ पातु' असं मी म्हणतांना खेळता खेळता मागे वळून, तर कधी आपणच डोळ्यांना हात लावून डोळे मिचकावू लागला.मध्यं पातु खरध्वंसी’ म्हणतांना नेहमीप्रमाणे पोटावर फुर्रऽऽऽ कर म्हणून धावत येऊ लागला.

आजारी पडल्यावर भीतीपोटी रामरक्षा म्हणायची नसते. बाळ आजारी पडायच्या अधीच घेतलेली ही काळजी असते. कुठल्याही येणार्‍या धोक्याची जाणीव ठेऊन संकटाचा सामना करण्यासाठी, संकट येण्याआधीच आपले हात, पाय, डोळे अशी सर्व इंद्रिय म्हणजेच आपली कामासाठी लागणारी उपकरण, शस्त्र सज्ज ठेवायला नकोत?

आज अशाच एका रामरक्षेची फार फार आवश्यकता आहे मला, तुम्हाला, आपल्या सर्वांना. देशाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी. जेंव्हा शरीर एखाद्या रोगाने पीडित आहे असं दिसतं तेंव्हा त्या रोगाचे जंतू पूर्वी पासून शरीरात सक्रीय असतात. त्याची लक्षण फक्त काही काळाने दिसू लागतात.
भरताचे प्रत्येक प्रांत हे त्याचे अवयवच आहेत. प्रत्येक प्रांताच्या महत्वाच्या बातम्या दिवसातून एकदातरी मी ऐकायला नको? वाचायला नकोत? (सिगारेटच्या धूराप्रमाणे पसरणार्‍या आरोग्य विघातक खोटारड्या प्रचारांनी माहिती तंत्रज्ञानसुद्धा अपंग झाल आहे. कावीळीने जग पिवळं दिसणारे चॅनेल्स आणि वृत्तपत्र भरमसाठ आहेत. त्यातूनही योग्य शोध घ्यायलाच लागतो.) भारताच्या प्रत्येक प्रांताप्रांतावर आपली नजर फिरली गेली पाहिजे. तेथे काय अनिष्ट गोष्टी चालू आहेत हे कुणाच्या बहकाव्यात न येता मी पण जाणून घेतलं पाहिजे. मला काय करायचं आहे असं मी म्हटलं तरी रोगट जंतूंसारखे तेथे घुसणारे लाभार्थी तसं म्हणत नाहीत. ते मात्र पूर्ण फायदा उठवतात मी केलेल्या दुर्लक्षाचा. पुष्ट होत राहतात माझ्या नजर न फिरवण्याने.

आणि मी?'माझा काय रोल आहे याच्यात?’ असं म्हणत अंग झटकून मोकळी झाले आहे मी फक्त नावं ठेवायला. — आणि बघत बसते कुठले तरी अचकट-विचकट शो— किंवा छान छान वाटणारे आणि मनाला विचारांपासून दूर दूर नेणारे गाणी, नाच सिनेमे तमाशे ! किंबहुना माझ्या सारख्या सामान्य मी' ने तेच बघावे अशी लोण्यावर डोळा असलेल्या सर्वच बोक्यांची इच्छा आहे.लोण्यासाठी आम्ही भांडतो तू शांत बघत बैस—-तू काढलेलं लोणी आमच्यापैकी कोण खातो ते’ हा उपदेश अंगवळणी पडला आहे माझ्या.

मध्यंतरी रियासतकार सरदेसाई यांचं ब्रिटिश रियासतीवर नजर फिरवत असतांना एका ब्रिटिश अधिकार्‍याने लिहून ठेवल्या ओळी आजही तंतोतंत खर्‍या आहेत असं वाटल. तो म्हणतो, `आम्ही राजाला जिंकल (बहुधा लखनऊ चा नबाब असावा) आणि रस्त्यावरून मिरवणुकीने जात होतो तेंव्हा आम्हाला पहायला रस्त्याच्या दुतर्फा झुंडीने लोक उभे होते. आमच्या मुठभर सैन्यावर त्यांनी नुसता हल्ला जरी चढवला असता तर आम्ही सर्व जण तेथेच मेलो असतो. पण तस झालं नाही.’ आजही त्वेशाने आम्ही फक्त आमचीच कत्तल करतो.

आजही रामाचे, कृष्णाचे प्रचंड उर्जा देणारे गुण आम्हाला वारंवार कथन करून, 100 वर्ष झोपणार्‍या शापित राजकुमारीसारखे आमच्यातील झोपी गेलेले चैतन्य जागृत करायची नितांत आवश्यकता आहे. पाय पडला तर धूळ सुद्धा उडून डोक्यावर बसते. मग आम्ही का नाही उठणार?

  • अरुंधती

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.