करोना काळामुळे रामटेक शोभायात्रेची परंपरा खंडित

Share This News

रामटेक: कोरोनाच्या वैश्‍विक संकटाचा परिणाम संपूर्ण जनजीवनावावर पडला असून, रामटेकची प्रसिद्ध शोभायात्रा महोत्सव जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने थांबविण्याचा निर्णय नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी घेतला असून, तसे परिपत्रकही काढलेले आहे.
दरवर्षी संत गोपालबाबा यांच्या मार्गदर्शनात रामटेक नगरीत दरवर्षी २८ नोव्हेंबर रोजी त्रिपुरी पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी शोभायात्रा, दुसर्‍या दिवशी रामरथ, त्रिपुरी पौर्णिमा आणि तिसर्‍या दिवशी मंडई असा भरगच्च कार्यक्रम राहायचा. रामटेकची भाऊबीज व्हायची ती त्रिपुरी पौर्णिमेला. गावागावातून विदर्भातील सर्वच जिल्हे तसेच छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यातूनही मोठय़ा संख्येने लोक रामटेक नगरीत दाखल व्हायचे. येथील नयनरम्य निसर्गासोबतच दिवाळी आनंदात साजरा करायचे. यावर्षी संत गोपालबाबा ब्रह्मलीन झाल्यावर आणि कोरोनाच्या काळातही ही शोभायात्रा निघेल, अशी रामटेककर व सर्व पाहुणे मंडळींच्या मनात होती. शोभायात्रेसाठी आमदार आशिष जयस्वाल, पर्यटकमित्र चंद्रपाल चौकसे, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, भारतीय जनसेवा मंडळाचे पदाधिकारी नत्थू घरझाडे, शंकर चामलाटे, सुनील रावत, बबलू दुधबर्वे यांनी प्रशासनाला निवेदनही दिले.

परंतु यात्रेच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गर्दी होणार असल्याने कोरोनाचा प्रसार खूप जास्त होऊ शकतो. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २00५, साथरोग व्यवस्थापन कायदा १८९७ व त्याखालील नियमावलीमधील नियम २ व १0 नुसार शोभायात्रा, रामरथ, मंडई यास कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बंदी घालण्यात आली. त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव मात्र शासनाने घालून दिलेल्या आदेशानुसार साजरा करावा व त्यावेळी सुरक्षित सामाजिक व शारीरिक अंतर, मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे असे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
सर्वांच्या नजरा लागून असलेल्या आणि दरवर्षी डोळ्यात साठवून ठेवणारा उत्सव यावर्षी होणार नसल्याने सर्वत्र निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच कोरोनाच्या संकटाने सर्वांचाच हिरमोड केला असून शोभायात्रा, रामरथ यावर्षी होणार नसल्याचे सर्वांनाच दु:ख आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.