राँगसाइड वाहन टाकले, पोलिसाला मारहाण; चिमूरचे आमदार भांगडिया यांना अटक
चंद्रपूर : चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया व त्यांच्या वडिलांना राँगसाइड वाहन चालविणे व पोलिसाला मारहाण केल्याप्ररकणी अटक करण्यात आली आहे. राजस्थानातील सिकर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आमदार भांगडिया यांच्यासह वडिल मितेश, भाऊ श्रीकांत, व्दारकादास, यवतमाळ येथील शंकरलाल या पाच जणांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
आमदार भांगडिया कुटुंबासह राजस्थान येथे गेले आहेत. सालासर येथील बालाजीच्या दर्शनानंतर ते सिकरमार्गे जैसलमेर येथे जात होते. त्यावेळी सिकर येथील प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यापासून त्यांना राजस्थान पोलिस दलात कार्यरत शिपाई गिरधारी लाल व महिला पोलिस शिपाई कमला यांनी सिल्व्हर ज्युबिली मार्गावरील एक. के. महाविद्यालयाजवळ अडविले. प्रतिबंधित क्षेत्रात बस शिरल्याने पोलिसांनी या बसला चालान केले. त्याचवेळी बसमधुन काही लोक उतरले व त्यांनी पोलिसांना मारहाण केली. त्यामुळे दोन्ही पोलिसांनी घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. अतिरिक्त ताफा घटनास्थळी पोहोचल्यानंतर वाद घालणाऱ्या व्यक्तींमध्ये आमदार कीर्तीकुमार भांगडिया असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिस शिपाई गिरधारी लाल यांनी तक्रार दाखल केली. गिरधारी लाल व महिला कॉन्स्टेबल कमला यांच्या तक्रारीवरून सिकर पोलिसांनी आमदार भांगडिया यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.
कोण आहेत भांगडिया?
कीर्तीकुमार भांगडिया हे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरचे भाजपचे आमदार आहेत. युवाशक्ती संघटनेच्या नावाने ते कामही करतात. अलीकडेच नागपूर सुधार प्रन्यासच्या घरकुल योजनेत सदनिका मिळविण्यासाठी खोटे शपथपत्र दिल्याच्या कारणावरून न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्याविरोधात नागपुरातील इमामवाडा व सक्करदरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हाही नोंदविला आहे. दरम्यान राजस्थानातील वादानंतर आमदार भांगडिया यांच्या अडचणीत वाढ होण्याचे संकेत आहेत.