– रश्मी पदवाड मदनकर

Share This News

आम्ही त्यांना दद्दा म्हणतो – ते मला बेटी. ते म्हणजे ८३ वर्षीय संतोष आनंद – एकशे एक सुरेल गीत ज्यांनी लिहिले, ज्यांची गाणी ऐकून आमचे लहानपण, तारुण्य सुरांनी भरून गेले असे गीतकार संतोष आनंद. त्यांच्या परिस्थितीची माहिती मित्रवर्य आणि संतोषजींचे मानसपुत्र Sanjay Belsare यांच्याकडून कळली तेव्हा कुठल्याश्या संकल्पनीशी २-४ मित्रांच्या मदतीने त्यांच्या समस्या सोडवायचा मनोमन प्रण केला आणि आम्ही सगळेच लागलो कामाला. माझ्याशी फोनवर बोलतांना एकदा ते म्हणाले होते ”मै कभी किसीके आगे हात नहीं फैलाता, पर अब ये दुःख मुझसे सहा नहीं जाता, मेरा कुछ हो गया तो मेरी पोती का क्या होगा ?” त्यांची पोती म्हणजे नात फक्त १० वर्षांची आहे. तिचे आई-वडील म्हणजे संतोष आनंदजींचा मुलगा आणि सून ह्यांनी ७ वर्षांपूर्वी रेल्वे रुळावर गाडी लावून आत्महत्या केली..त्या अपघातात ४ वर्षांची नात दूर फेकली गेली आणि सुदैवाने वाचली, आता तिची संपूर्ण जबाबदारी ह्या म्हाताऱ्या-म्हातारीवर आहे. आपल्याला किती मदत करता येईल हे माहिती नसतांना निदान या चिमुकल्या नातीनीच्या शिक्षणाची सोय तरी करावी या हेतूने दिल्लीच्या एअरपोर्ट बालभारती स्कुलमध्ये ऍडमिशनसाठी प्रयत्न सुरु झाले, आधी तिची ऍडमिशन नंतर त्यांना नागपुरात आणून एखादा चॅरिटेबल गाण्याचा कार्यक्रम करून फंड रेज करून त्यांची मदत या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दिवंगत आनंद कोहली अंकलनी देखील पूर्ण तयार केली होती (दुर्दैवानं आज ते आपल्यात नाहीत) …आणि शासनाच्या अनेक योजनांमधून पर्मनंट एखादे पेन्शन वगैरे सुरु करायचे ठरले होते… या दरम्यान दिवाळी अंकाचे काम सुरु झाले होते, माध्यमातील आमचा मित्र आणि सिनेलेखनात हातखंडा असणारा Abhishek Khule या गुणी लेखकाने अत्यंत व्यस्त असूनही माझ्या आग्रहाखातर त्यांची सर्व परिस्थिती अभ्यासपूर्ण रीतीने मांडत एक सुरेख लेख त्यांच्यावर लिहिला. ‘अनलॉक’ दिवाळी अंकातील अनेक दर्जा लेखांपैकी हाही एक उत्कृष्ट लेख ठरला, ज्यावर चारही स्तरातून चर्चा झाली. 

 
 कुठून सुरुवात करावी, तर एकदा ते म्हणाले ”बस एकवार मेरी मुलाखात नितीनजी से करवा दिजीये” मी तरुण भारत डिजिटलचे संपादक मा. Shailesh Pande सरांशी याबद्दल बोलले, त्यांनी परिस्थिती समजून घेतली आणि विनाविलंब लगेच दुसऱ्याच दिवशी नितीन गडकरींना विषय सांगितला .. सरांच्या शब्दाखातर नितीनजींनी स्वतः संतोष आनंद ह्यांना फोन लावला, त्यांचे बोलणे झाले – भेटीचे आश्वासन वगैरे झाले. नितीनजींनी त्यांच्या मदतीसाठी माणूसही कामाला लावला..संतोषजींची एक इच्छा आम्ही पूर्ण करू शकलो होतो. पुढला विषय होता त्यांच्या मागण्या नितीनजींपर्यंत पोचवण्याचा. एकतर मधल्या काळात दिल्लीत प्रचंड वाढलेला कोरोना आणि त्यात शहरभर-गल्ली-बोळीत चालू असलेले शेतकरी आंदोलन शहरातल्या शहरात एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे मुश्किल झाले असतांना नागपूरहून आमच्यापैकी कोणी दिल्लीत पोचणे तर शक्यच नव्हते. हे सगळं निवळून या आठवड्यात Anand Ambekar सरांच्या मदतीने एक दिल्लीतले सरांचे परिचित निवेदनावर सही घ्यायला जाणार होते .. नाहीच जमले तर मग मी स्वतःच जाण्याचे आणि तिथे प्रत्यक्ष संतोषजींना घेऊन जाऊन नितीन गडकरी ह्यांची भेट करून देण्याचे ठरलेच होते की, की इंडियन आइडल मधून दद्दांना बोलावणे आले. त्याची शूटिंग झाल्यानंतरचा वृत्तांत कळला तेव्हा खरतर आनंदच झाला होता. नेहा कक्कडने देऊ केलेली मदत, हिमेश रेशमियाने, विशालने कामाचे दिलेले आश्वासन … वाटले चला दद्दांच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक घडलय. त्यांच्या अडचणी दूर होऊ लागल्या आहेत. पण आज एपिसोड पहिला आणि अत्यंत मन भरून आलं. ‘मुझे किसीको अपनी लाचारी नही दिखानी’ असं कळवळून म्हणणारे दद्गा सतत डोळ्यासमोर येत राहिले. मदत म्हणून निघालेले आम्ही चारपाच लोकं या गोष्टीची काळजी घेत असतांना .. चॅनलने TRP साठी दद्दांची लाचारी सरेआम चव्हाट्यावर मांडून, मदतीचा आव आणणारी हि माणसे देखील मदतीचा गाजावाजा मीडियापासून सोशल मीडियापर्यंत करत सुटलेत ह्याचा दद्दांच्या जीवाला काय त्रास झाला असेल हे आम्ही चांगले जाणतो आहे. 


या कानाची त्या कानाला खबर न होऊ देता ज्या निष्ठेने आम्ही या मदत कार्याला लागलो होतो ते सगळं आजच्या या एका एपिसोडणं पाण्यात मिळवलय असं वाटू लागलं. दद्दांकडे कुणीही दयाभावने, सहानुभूतीने पाहून त्यांना मदत करू नये. त्यांनी त्यांच्या गीतांनी या इंडस्ट्रीला आणि संगीत प्रेमींसाठी जे योगदान दिलय त्यांच्या त्या हक्काचं त्यांना मिळावं आणि अत्यंत आदरपूर्वक मिळावं .. लोकांनी त्यांना त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीसाठी नाही तर त्यांच्या कलेसाठी, त्यांच्या गीतांसाठी लक्षात ठेवावे इतकच मनापासून वाटतंय..
ईश्वर त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायु आणि शेवटच्या क्षणांपर्यंत सृजनशील राहण्याची ताकद देओ हीच कळकळीची विनवणी आणि प्रार्थना !!
– रश्मी पदवाड मदनकर


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.