कित्येक विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षा देण्याची वेळ
अनेकांच्या उत्तरपत्रिका जमाच झाल्या नाहीत
अनेकांच्या उत्तरपत्रिका जमाच झाल्या नाहीत; विद्यापीठाने महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या याद्या पाठवल्या
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून अंतिम वर्षांच्या ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा सुरळीत झाल्याचा दावा फोल ठरला आहे. विद्यापीठाच्या तांत्रिक गोंधळामुळे परीक्षा देऊनही हजारो परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिका ‘सव्र्हर’वर जमा न झाल्याने त्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची वेळ येणार आहे.
नागपूर विद्यापीठाच्या ८ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या सर्व परीक्षा आटोपल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाने महाविद्यालयांना सूचना पत्र पाठवत त्यांच्या महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांची परीक्षेची माहिती विद्यापीठाकडे पोहचली नसल्याचे सांगितले. यामध्ये कला आणि विज्ञान शाखेतील हजारो विद्यार्थी आहेत. प्राप्त माहितीनुसार, कला शाखेच्या ४ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका विद्यापीठाकडे जमा झालेल्या नाहीत. यामध्ये समाजशास्त्र विषयाचे १,१०० परीक्षार्थी, इंग्रजीचे १,५०० हजार, इतिहास विषयाचे ९०० तर अन्य विषयांच्या २०० परीक्षार्थीचा समावेश आहे. याप्रमाणे बीएस्सीच्या २५० विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका विद्यापीठाला मिळालेल्या नाहीत.
याआधी अभियांत्रिकीच्या २,९२५ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका विद्यापीठाला मिळालेल्या नव्हत्या. त्यामुळे विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या परीक्षेचे दुसऱ्यांदा आयोजन केले आहे. याप्रमाणे आता कला आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचीही दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची वेळ येणार आहे. विद्यापीठाच्या गोंधळाची शिक्षा विद्यार्थ्यांना भोगावी लागणार असल्याने सर्वाचा प्रचंड मन: स्ताप होत आहे.