कारागृह अधीक्षकांच्या सर्व्हिस बुकमध्ये अवमान नोटीसची नोंद| Record of contempt notice in prison superintendent’s service book

Share This News

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुप कुमरे यांच्या सर्व्हिस बुकमध्ये उच्च न्यायालयाने बजाविलेल्या अवमान नोटीस आणि एकूण प्रकरणाचा उल्लेख करा, असे आदेश देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांचा माफीनामा मान्य केला आहे.


उच्च न्यायालयाने एका कैद्याला सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही कारागृह अधीक्षक कुमरे यांनी त्याला न सोडता एक दिवस अधिक कारागृहात ठेवून घेतले, असा आरोप त्यांच्यावर होता. रविशेखर लोंदेकर हे कैद्याचे नाव आहे. त्याला एका प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांनी शिक्षा ठोठावली होती. पुढे सत्र न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयाला तपास यंत्रणा सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले. सीबीआयने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लोंदेकरला ताब्यात घेऊन सत्र न्यायालयात हजर केले. सत्र न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली. त्याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने ताबडतोब लोंदेकरला सोडण्याचे आदेश दिले.
मात्र कारागृह अधीक्षक कुमरे यांनी त्याला त्या दिवशी न सोडता दुसऱ्या दिवशी सोडले. या घटनाक्रमावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. अधीक्षकांवर अवमानना याचिका का करू नये, यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे आदेश यापूर्वी न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, गुरुवारी कारगृह अधीक्षकांचे वकील पी. के. सत्यनाथन यांनी न्यायालयापुढे उत्तर सादर केले. या उत्तराद्वारे कुमरेंनी न्यायालयासमोर बिनशर्त माफी मागितली. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांची माफी मान्य केली. मात्र, त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये अवमान नोटीस आणि याप्रकरणाचा उल्लेख करावा, असे आदेश देत न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.