राज्यातील साडेसात लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंदणी Registration of 7.5 lakh health workers in the state for vaccination
मुंबई : राज्यातील साडेसात लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविन सॉफ्टवेअरवर लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. राज्यात सुमारे ७० हजार कार्यरत आशावर्कर्सना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. आशा कामगारांची अद्याप नोंदणी झालेली नाही, त्यामुळे आता लवकरच यांनाही यादीत समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. राज्याच्या टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, लसीकरण प्रक्रियाही आव्हानात्मक असेल. याकरिता राज्य शासन व पालिका पातळीवर ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली. त्याप्रमाणे, लसीकरण प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात येईल. कोरोना लस ही टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे, तर डॉ. राहुल पंडित म्हणाले की, कोणतीही लस १०० टक्के सुरक्षित नसते. मात्र, जो अभ्यास झाला, त्यात या लस सुरक्षित असल्याचे दिसते. मनपा रुग्णालयांना मेडिकलचा मोठा अभ्यास आहे. यापूर्वीही लसीकरणाचे कार्यक्रम राबविले आहेत. ज्यांना कोरोना होऊन गेला, ज्यांना झाला नाही, त्या सगळ्यांना या लसीची गरज आहे, ही लस अँटिबॉडी निर्माण करते, इम्युनिटी वाढविते. डिसेंबरअखेरीपर्यंत राज्यातील १६ हजार १०२ आरोग्य कर्मचारी कोविडमुळे संक्रमित झाले होते. त्यापैकी ११ हजार कर्मचारी सरकारी आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. राज्यात कोरोनाने आतापर्यंत १७८ आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.