महामारीला आळा घालण्यासाठी आमनदीत पाणी सोडा

Share This News

कुही
तालुक्यातील मांढळ – पचखेडी येथील आमनदी घाटावर सध्या अनेक अंत्यविधी होत आहे. अंत्यविधी आटोपल्यावर तिथेच रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम उरकवत आहेत. मात्र, सध्या आमनदीला वाहते पाणी नसल्याने एका साईडच्या पाण्यातच रक्षा विसर्जन व अंत्यविधीला येणारे नागरिक तिथेच अंघोळ आटोपत असल्याने असणार्‍या पाण्याची दुर्गंधी वाढत असून, महामारी जोर धरत आहे. यासाठी महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमनदीत पाणी सोडणे गरजेचे आहे. तरी आमनदीत पाणी सोडण्याची मागणी नागरिक करीत आहे.
यंदाच्या मोसमात मानव जातीवर निसर्ग कोपला असून, कोरोनाच्या महामारीचे संकट आवासून उभे असताना निसर्गातील वातावरणामुळे विविध रोगाने डोके वर काढले आहे. त्यामुळे शासनाच्या अध्यादेशानुसार मयतीला जाण्यासाठी फक्त २५ नागरिकांचीच परवानगी आहे. त्यातच कोणताही रुग्ण कोणत्याही आजाराने मरण पावला तरी तो कोरोणाने तर मरण पावला नाही ना? अशी मनात शंका निर्माण होत असल्याने कोणीही मयतीला जायला धजावत नाही. त्यामुळे दहा ते पंधरा नागरिक प्रेत नेऊन त्यांचा अंत्यविधी आटोपताना दिसुन येत आहे.
कुही तालुक्यात मांढळ -पचखेडीच्या मधात उत्तर वाहिनी आमनदी वाहते. येथे संपूर्ण जिल्ह्यातून अस्थिविसर्जनासाठी नागरिक येतात तर याच नदीवर पचखेडी, मांढळ, जिवनापूर व सोनेगाव येथील नागरिक प्रेत जाळण्यासाठी आणतात. मात्र, मृत्यूची संख्या वाढल्याने व नागरिकही मोजकेच असल्याने त्यातच काही प्रेत पूर्ण जळण्याच्या आधीच पाण्यात ढकलून अस्थिविसर्जन केल्या जात आहे. त्यामुळे आधीच नदी कोरडी झाली आहे व त्यातच डबक्यात असलेल्या पाण्यात अर्धवट जळलेल्या मानवी मासांचे तुकडे साचल्याने पाणी दुषित झाले आहे. तरीही याच पाण्यात अस्थिविसर्जन करून नाईलाजास्तव नागरिक आंघोळही करतात.
मागील आठवड्यात याच घाटावर रात्री अकरा वाजताच्या दरम्यान एक प्रेत जाळले ते पूर्ण जळण्याच्या आधीच पाण्यात फेकल्याने त्या प्रेताच्या मांसाला कुत्र्याने खाल्ले व तो कुत्रा परसोडी येथील एका नागरिकाला चावल्याची माहिती आहे. आमनदी ही उमरेड तालुक्यातील मकरधोकडा येथुन उगम पावत असून, आंभोरा येथे वैनगंगेला विसर्जित होते. मकरधोकडा जलाशयातील पाणी दरवर्षी आमनदीत सोडण्यात येते. नदी काठावरील कित्येक गावांतील गुरेढोरे याच नदीचे पाणी पीत असतात. मकरधोकडा ते आंभोरा यामध्ये आमनदीवर कित्येक स्मशानघाट आहेत. तर कित्येक घाटावर अस्थिविसर्जन करण्यात येते. मात्र, पचखेडी घाटावर जी परिस्थिती आहे, तीच परिस्थिती बाकी घाटावर आहे. सध्याच्या काळात जी परिस्थिती ओढविली आहे, त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी व महामारीवर आळा घालण्यासाठी आमनदीत पाणी सोडणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिक करीत आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.