महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांचे पार्थिव पोस्टमार्टमसाठी चंद्रपूरात दाखल
डॉ. शीतल आमटे-करजगी यांचे पार्थिव पोस्टमार्टमसाठी चंद्रपूरात दाखल.समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणिआनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे- करजगी यांनी आज आत्महत्या केली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. डॉ. शीतल या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. तसंच, शीतल आमटे- करजगी काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. शीतल यांनी विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे . शीतल आमटे यांनी केलेल्या या फेसबुक लाइव्हनंतर व आनंदवनातील कार्यकर्त्यांबद्दल केलेल्या आरोपांनंतर आमटे कुटुंबाकडून निवेदन जारी करण्यात आलं होतं. या निवेदनातून शीतल यांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले होते. तसंच, या निवेदनावर डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे व डॉ. प्रकाश आमटे – डॉ. मंदाकिनी आमटे यांनीही सह्या केल्या होत्या.संपूर्ण आमटे कुटुंब बाबा आमटेंच्या कार्याशी मागील तीन पिढ्यांपासून समरस आहे. आमच्या कुटुंबातील डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आमच्या कार्यात योगदान दिले आहे. तथापि, त्या सध्या मानसिक ताण, नैराश्याचा सामना करीत आहेत. त्यांनी अलीकडेच समाज माध्यमांवर तशी स्पष्ट कबुलीही दिली आहे. त्यांच्या निवेदनामुळे कोणचाही गैरसमज होऊ नये म्हणून आमटे परिवार हे संयुक्त निवेदन परस्पर विचारविनिमय करून प्रस्तुत करीत आहे,’ असं त्या निवेदनात स्पष्ट केलं होतं.गेल्या अनेक महिन्यांपासून बाबा आमटेंचं आनंदवन चर्चेत आहेत. बाबा आमटे यांनी सुरु केलेले अनेक उपक्रम बंद पडले आहेत, कार्यकर्त्यांचे आरोप प्रत्यारोप, आनंदवनाच्या कारभारात कॉर्पोरेट संस्कृतीचा शिरकाव असे अनेक आरोप आनंदवनात होऊ लागले होते. मात्र, डॉ, शीतल आमटे यांनी वेळोवेळी हे आरोप फेटाळून लावत त्यावर स्पष्टीकरणही दिलं होतं.
.