अरेच्चा..चक्क रुग्णांसाठी नागपुरात निवासी डॉक्टरांचे धरणे!

Share This News

नागपूर : स्वत:च्या मागण्यांसाठी विविध क्षेत्रातील प्रोफेशनल्स आंदोलन करत असतात. मात्र, करोनाकाळात रुग्णांची होत असलेली हेळसांड, त्यांना मिळत नसलेल्या सेवा-सुविधांसाठी निवासी डॉक्टरांनी धरणे दिल्याची घटना रविवारी घडली.


सध्या करोनाच्या प्रादुर्भावाने जोर पकडला आहे. कुणाला खाटा मिळत नाहीये. कुणाला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाहीये. कुठे व्हेंटिलेटर नाही तर कुठे रेमडेसिव्हिरचा तुटवडा आहे. ही सर्व स्थिती रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. बाधितांची संख्या वाढत आहे. त्याच बरोबरीने मृतकांचा आकडाही धडकी भरवित आहे. शासकीय रुग्णालयांचा विचार करता तिथे मनुष्यबळाची अनुपलब्धता अधिक चिंतेचा विषय ठरत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्याल आणि रुग्णालय (मेडिकल) तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो) निवासी डॉक्टरांनी धरणे आंदोलन केले. रविवारी रात्री ९ वाजता धरणे सुरू झाले. कामबंद न करता, रुग्णांची गैरसोय होऊ न देता हे धरणे आंदोलन यशस्वीरित्या पार पडले. याप्रसंगी निवासी डॉक्टरांनी आपली ड्युटी सांभाळत रुग्णांच्या होणाऱ्या दुर्दशेकडे सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मार्ड वा अन्य कुठल्याही संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन न करता निवासी डॉक्टरांनी स्वयंस्फुर्तीने सामूहिक नेतृत्वात धरणे दिले. काही दिवसांपूर्वी मार्डच्या नेतृत्वात दोनदिवसीय संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तो निर्णय रद्द झाल्यानंतर निवासी डॉक्टरांनी स्वत:हून यासाठी पुढाकार घेतला.


रुग्णांना रेमडेसिव्हिर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा मिळण्यात प्रचंड अडचण जात आहे. नवीन पदभरती होत नाहीये. त्यामुळे रुग्णांकडे लक्ष देणारी यंत्रणा कमकुवत दिसून येत आहे. ही स्थिती बदलायला हवी. कुठपर्यंत परिस्थिती अशीच राहणार, यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणी धरणे आंदोलनात करण्यात आल्याची माहिती निवासी डॉक्टर सजल बन्सल आणि आशुतोष जाधव यांनी दिली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.