केवळ ‘उदयोन्मुख’ क्षेत्रातील अभ्यासक्रम सुरू करण्याची अट
अभियांत्रिकी महाविद्यालयांवर बंधने restrictions-on-engineering-colleges-
नागपूर : अभियांत्रिकी महाविद्यालयांना यापुढे नवीन अभ्यासक्रम सुरू करणे किंवा आवश्यक जागांमध्ये वाढ करायची असल्यास केवळ ‘उदयोन्मुख’ क्षेत्रातील अभ्यासक्रमच सुरू करता येणार आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) नुकतेच तसे परिपत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी असणाऱ्या अभ्यासक्रमांच्या क्षमता वाढीवर निर्बंध लागणार आहेत. कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ‘एआयसीटीई’ने स्पष्ट केले आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार केंद्र सरकारने नावीन्य आणि उद्योजकतेला लक्षात घेता महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा विकल्प दिला आहे. हे सर्व अभ्यासक्रम आंतरविद्या शाखेतील आहेत. ‘एआयसीटीई’च्या पत्रानुसार या अभ्यासक्रमांमुळे कौशल्य विकासाला चालना मिळून अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये नोकऱ्यांमध्ये वाढ होईल, मात्र अभियांत्रिकीकडे गत काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याने महाविद्यालये संकटात आहेत. त्यामुळे विद्यार्थाच्या मागणीचा विचार न करता नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास महाविद्यालये पुढाकार घेणे अशक्य आहे.
या नवीन पत्रकामुळे महाविद्यालयांवर बंधने लादली जात असल्याचा आरोप अभियांत्रिकी महाविद्यालयांनी केला आहे. आधीच अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांचे संकट आहे. जर प्रयोग म्हणूनही नवीन अभ्यासक्रम सुरू केला तर त्यातही आवश्यक प्रवेश मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ज्या शाखांमध्ये विद्यार्थ्यांची मागणी आहे त्यात पुन्हा प्रवेश क्षमता वाढवण्याची परवानगी दिली असती तर अधिक फायदा झाला असता, असे सांगण्यात आले.
जागांमध्ये दरवर्षी घट : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये देशभरातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या कमी झाली. मागील वर्षी देशातील एकूण १० हजार ९९२ महाविद्यालयांमध्ये ३२ लाख ९ हजार ७०३ जागा उपलब्ध होत्या, तर सत्र २०२०-२१ मध्ये आता ९ हजार ६९१ महाविद्यालयांमध्ये केवळ ३० लाख ८८ हजार ५१२ जागा उपलब्ध आहेत. मोठय़ा प्रमाणात महाविद्यालये बंद पडत असल्याचे चित्र असताना ‘एआयसीटीई’चे हे पत्रक आणखी अडचणी वाढवणारे आहे, हे विशेष.