राज्यात पुन्हा रिपाइं-भाजपची युती

Share This News

मुंबई : राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) आणि भारतीय जनता पार्टीची युती कायम राहणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. यासंदर्भात आठवले यांनी मंगळवारी मुंबईत भाजपचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या वर्षी होत असलेल्या नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि अन्य महापालिकांच्या निवडणुकीत रिपाइं भाजपला साथ देणार आहे. पुढील वर्षी होत असलेल्या मुंबई महापालिका आणि जिल्हा परिषदांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-रिपाइं युतीबाबत आठवले यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली. भाजप आणि रिपाइंचे विभागनिहाय संयुक्त मेळावे घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे राज्यव्यापी अधिवेशन येत्या २१ मे रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण रिपाइंतर्फे फडणवीस यांना देण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना कमळ चिन्ह देण्यात यावे, याबाबत चर्चा करण्यात आली. सांगली आणि पुणे येथे रिपाइंला उपमहापौर पद देण्याबाबत चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारच्या विविध समिती, महामंडळांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना पद देण्याबाबत फडणवीस आणि आठवले या उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबालकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, सुरेश बारशिंग, चंद्रशेखर कांबळे, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, संजय सोनवणे आदी उपस्थित होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.