नागपुरात धावणार रबरवाली मेट्रो : गडकरी

Share This News

नागपूर : नाशिकप्रमाणे रबरचे टायर असणारी मेट्रो तिसऱ्या टप्प्यात नागपुरात धावणार आहे. अमरावती मार्गावर हा प्रकल्प साकारला जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले. वर्धा मार्गावरील मेट्रोच्या एअरपोर्ट साउथ स्थानकावरील सभागृहात रविवारी चिंचभुवन पुलाचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी गडकरी बोलत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार दत्ता मेघे, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, संदीप जोशी यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल, प्रकल्प संचालक अभिजित जिचकार आदी उपस्थित होते. करोना पॉझिटिव्ह असतानाही गृहमंत्री अनिल देशमुख व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

नागपूर काटोल मार्ग लवकरच
नागपूर काटोल मार्ग खूप खराब झाला असून याला गती देण्याची मागणी देशमुख यांनी गडकरी यांच्याकडे केली. यावर गडकरी यांनी कळमेश्वर मार्गावरील अपघातामुळे या मार्गावरून जाण्याची भीती वाटत असल्याचे सांगितले. सेनेसाठी नवी कार घेतली असून या मार्गावर जाऊ नको, असे सांगितले. वनमंत्र्यांकडे या मार्गाची फाइल रखडली आहे, त्यावर स्वाक्षरी घेऊन द्या, हा मार्ग लवकर पूर्ण करणार असल्याचे गडकरी म्हणाले.

आणखी एक उड्डाणपूल
इंदोरा चौकातून नवीन उड्डाणपूल होणार आहे. नागपूर-उमरेड मार्गाचे येत्या सहा महिन्यात उद्घाटन होणार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ते आरटीओ कार्यालय या मार्गावर नवा उड्डाणपूल होणार आहे. फुटाळ्यातील कारंजे जगातील सर्वांत उंच असतील. मल्टीमॉडेल स्टेशन, लॉजिस्टिक पार्क, बुटीबोरीपर्यंत सहापदरी रस्ता, नागपूर-विजयवाडा द्रुतगती मार्ग, ब्रॉडगेज मेट्रो असे विकासाचे नवे उड्डाण नागपुरात तयार होत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. अजनीतून देशात सर्वच ठिकाणी गाड्या सुटतील, वृक्षतोड होणार. मात्र यातील अनेक झाडे न तोडता दुसऱ्या ठिकाणी लावण्यात येतील. तुटतील त्यापेक्षा अधिक झाडे लागणार असल्याचे गडकरी म्हणाले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.