सचिन वाझे प्रकरण : जे दोषी असतील; त्यांच्यावर कारवाई होणार : अजित पवार Sachin Waze case: Those who are guilty; Action will be taken against them: Ajit Pawar

Share This News

मुंबई :

सध्याl राज्यात सचिन वाझे प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. भाजपने या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली असून, महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या देखील चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत आज (मंगळवार)माध्यमांसमोर बोलाताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, कुणाला मंत्रीमंडळात ठेवायचे आणि कुणाला काढायचे हे ज्या त्या पक्षाचे काम असते. जे दोषी असतील, ज्याच्यापर्यंत ते धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

पुढे ते म्हणाले, सुरूवातीपासून मुख्यमंत्री व महाराष्ट्र सरकारने सांगितलेले आहे की, कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाल्यानंतर जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचे महाविकासआघाडी सरकारचे काही कराण नाही आणि सरकार तसे अजिबात करणार नाही. हे मी देखील राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने स्पष्ट करू इच्छितो. एनआयए व एटीएस या दोन्ही तपास यंत्रणा आता चौकशी करत आहेत. त्यामुळे ज्या काही घटना समोर येत आहेत, त्याप्रमाणे त्यासंदर्भातील कारवाई करण्यात येईल हे मी स्पष्टपणे सांगतो.

तसेच, महाविकासआघाडीचे सररकार शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून इतर मित्रपक्षांना बरोबर घेऊन तयार केलेले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ही चांगलीच असली पाहिजे. कुणालाही पाठीशी घालण्याचे अजिबात काही कारण नाही. कुणी कुठल्या पक्षात होतं, कुठल्या पक्षात नव्हतं तो ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. आता काही दिवसांपूर्वी सभागृह सुरू असताना मला सभागृहात विरोधी पक्षाने एक गोष्ट लक्षात आणून दिली की, विरोधी पक्षनेत्याबद्दल सोशल मीडियावर काही चुकीच्या पद्धतीच्या बातम्या दिल्या गेल्या. त्यावेळी ताबडतोब आम्ही सभागृहात सांगितलं की संध्याकाळ होण्याअगोदर त्या संदर्भातील चौकशी केली जाईल आणि जो दोषी असेल त्याला अटक केली जाईल, त्यानंतर रात्रीपर्यंत संबंधितास अटक करण्यात आली आहे.

तशाच पद्धतीने आता या दोन्ही तपास यंत्रणा चौकशी करत आहेत, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप हा कुणाचाही असता कामा नये हीच आमची, सरकारची भूमिका असणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.