सचिन वाझे यांच्या जामिनावर १९ मार्चला सुनावणी Sachin Waze’s bail hearing on March 19

Share This News

ठाणे, १३ मार्च : मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर १९ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार असून वाझे यांना अटक होते की जामीन मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या तपास अधिकाऱ्यांचे या अटकपूर्व जामीन अर्जावर काय म्हणणे आहे, ते पुढील सुनावणीत मांडले जावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 
काय आहे पार्श्र्वभूमी?
सचिन वाझे यांच्यावर मनसुख हिरेन या ठाण्यातील व्यापाऱ्याची हत्या केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने दिलेल्या माहिती नुसार मनसुख यांची पत्नी विमला यांनी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकात एफआयआर दाखल केली आहे. या एफआयआर नुसार सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वाझे यांच्यावर हत्या, हत्येचा कट रचणे, गुन्हेगारी कृत्य आणि पुरावे नष्ट करणे असे आरोप ठेवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार त्यांच्यावर ३०२, २०१, ३४ आणि १२० (ब) ही कलमे लावण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र आता यावर १९ मार्चला सुनावणी होणार आहे.
वाझे यांच्या व्हॉट्स ॲप स्टेटसमुळे चर्चेला उधाण 
दरम्यान वाझे यांच्या व्हॉट्स ॲप स्टेटसमुळे चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ३ मार्च २००४ पासून काही सीआयडी अधिकाऱ्यांनी एका खोट्या प्रकरणात मला अटक केली. त्या प्रकरणात आत्तापर्यंत काहीच निष्पन्न झालं नाही.पण आता इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतेय. माझे सहकारी मला पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न करतायत. १७ वर्ष मी संयम बाळगला, आता माझ्याकडे ती १७ वर्षे जगण्याचा, सेवा करण्याचा कसलाही संयम नाही. आता या सर्वाला निरोप द्यायची वेळ जवळ येत चालली आहे, असं मला वाटतय, असेही वाझेंनी म्हटले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.