सचिन वाझेच्या कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ

Share This News

मुंबई
अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये ठेवण्यात आलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणाचा एनआयए तपास करत आहे. या प्रकरणी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीमध्ये आहेत. त्यांची कोठडी संपल्यामुळे त्यांना एनआयएच्या विशेष कोर्टात हजर केले. अधिक तपासासाठी एनआयएकडून सचिन वाझेंच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य करत विशेष एनआयए कोर्टाने सचिन वाझेंची पोलिस कोठडी ७ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. दरम्यान, आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास देखील एनआयए करत असत असून त्या प्रकरणी देखील सचिन वाझेची चौकशी सुरू आहे. या तपासात अनेक खुलासे झाल्याचे एनआयएकडून सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे न्यायालयाने मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचे आदेश महाराष्ट्र एटीएसला दिले होते. त्यानुसार हा तपास आणि या प्रकरणी अटक करण्यात आलेले दोन आरोपी यांना एनआयएला हस्तांतरीत करण्यात आले.
आधी अँटिलियाबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात सचिन वाझेंविरोधात एनआयएला पुरावे मिळाल्यानंतर आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणात देखील सचिन वाझेंचाच हात असल्याची बाब समोर आली आहे. सचिन वाझे यांच्याशी संबंधित या प्रकरणातील ७ ते ८ कार एनआयएने ताब्यात घेतल्या आहेत. याशिवाय, या प्रकरणात अटक करण्यात आलेले विनायक शिंदे आणि बुकी अशा दोघांनीही या प्रकरणात सचिन वाझेचा सहभाग असल्याची कबुली दिली आहे. त्यासोबतच, जिलेटिनच्या कांड्या सापडलेली कार हरवल्याची माहिती मनसुख हिरेन यांनी पोलिस जबाबात दिली होती. पण ती कार स्वत: मनसुख हिरेन यांनीच सचिन वाझेना दिल्याची माहिती समोर आली आहे.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.