विनापरवानगी ॲन्टिजेन टेस्ट करणा-या संगई लॅबला पन्नास हजारांचा दंड | Sangai Lab fined Rs 50,000 for testing antigen without permission

Share This News

अमरावती : खासगी लॅबकडून होणारी ॲन्टिजेन टेस्टची प्रक्रिया यापूर्वीच रद्द केली आहे. मात्र, रुग्णाच्या घरी जाऊन ॲन्टिजेन टेस्ट करून त्यांना पॉझिटिव्ह असल्याबाबत लेखी रिपोर्ट न देता तोंडी माहिती देऊन रुग्णाची बोळवण करणा-या येथील डॉ. उल्हास संगई यांच्या संगई पॅथॉलॉजी लॅबला पन्नास हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

        जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या अहवालावरून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ही कारवाई केली. याबाबत माहिती अशी की, येथील रहिवाशी राजेश विश्वेश्वर कानव व सुनंदा विश्वेश्वर कानव यांनी कोरोना चाचणी करण्याबाबत संगई पॅथॉलाजी लॅबला दूरध्वनीद्वारे विनंती केली. त्यानुसार लॅबच्या प्रतिनिधीने त्यांच्या घरी येऊन रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली. त्यानंतर लॅबच्या प्रतिनिधीकडून  या दोन्ही व्यक्ती कोरोना संक्रमित (पॉझिटिव्ह) असल्याचे व सुपर स्पेशालिटी रूग्णालय येथे दाखल होण्याबाबत तोंडी सांगण्यात आले. संगई लॅबतर्फे कानव कुटुंबाला कुठलाही लेखी रिपोर्ट देण्यात आला नाही. त्यानंतर कानव कुटुंबीय सुपर स्पेशालिटी रुग्णालय भरती होण्यासाठी गेले असता हॉस्पिटलने रिपोर्टची मागणी केली. तथापि, तसा रिपोर्ट लॅबने दिला नसल्याचे कानव यांनी सांगितले. लॅबला रॅपिड ॲन्टिजन टेस्ट थांबविण्याबाबत व अशी चाचणी करण्याची लॅबची मान्यता रद्द करत असल्याबाबत आरोग्य प्रशासनाने यापूर्वीच पत्र दिले होते. त्यानंतरही लॅबकडून ॲन्टिजन टेस्ट केली जात असून, केवळ तोंडी माहिती देऊन रुग्णाची बोळवण केली जात असल्याचे विभागीय संदर्भ रुग्णालयाला आढळून आले.

त्यावरून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपेश खडसे व डॉ. सोपान भोंगाडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या प्राप्त अहवालावरून अमरावती येथील डॉ. उल्हास संगई यांच्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये विनापरवानगी ॲन्टिजेन टेस्ट केली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाला आढळून आले. त्यावरून जिल्हा दंडाधिकारी श्री. नवाल यांनी डॉ. संगई यांना 50 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

त्यानुसार या रकमेचा भरणा सात दिवसांच्या आत महापालिकेकडे करावा आणि येथून पुढे कोणत्याही प्रकारचे विधीग्राह्य नसलेले कृत्य केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, तसेच लॅबोरेटरी बंद करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदेशान्वये देण्यात आला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.