कोरोना लसीकरणात सांगली जिल्हा राज्यात ‘टॉप पाच’मध्ये Sangli district in the top five in the state in corona vaccination

Share This News

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिह्यातील सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करीत आहेत. जिह्यातील जनतेनेही कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोना लसीकरणात सांगली जिल्हा राज्यात टॉप पाचमध्ये असल्याची माहिती सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.

राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सांगली जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू असून, 28 हजार 424 हेल्थ वर्कर्सपैकी 20 हजार 524 जणांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर, 10 हजार 392 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. फ्रंटलाइन वर्कर्समध्ये 11 हजार 293 पैकी 8 हजार 596 जणांनी पहिला डोस घेतला आहे. 2 हजार 50 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये 29 हजार 753 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर, 45 वर्षे वयावरील को-मॉर्बिड 5 हजार 407 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. जिल्ह्यात एकूण 64 हजार 280 जणांनी पहिला डोस, तर 12 हजार 442 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचे हे प्रमाण राज्यात पहिल्या पाच क्रमांकामध्ये आहे.

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून, हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडकपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना आपण प्रशासनाला केल्या आहेत. जिल्हा प्रशासन याबाबत ठोस कृती करेल. जिल्ह्यात वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची वारंवार तपासणी करण्याच्याही सूचना प्रशासनाला केली आहे. तसेच, ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे व जे होम आयसोलेशनमध्ये आहेत, त्यांच्या हातावर होम आयसोलेशनचा शिक्का मारण्यात येणार आहे. त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या घरासमोर कोविड रुग्ण असा फलकही लावण्यात येणार आहे.

मिरज वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून, सद्यस्थितीत मागणी असणाऱ्या सर्व सुविधा येत्या काळात वैद्यकीय महाविद्यालयास पुरविण्यात येतील. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, जिह्यात पुरेसे बेड उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ऑक्सिजनचा पुरवठाही पुरेशा प्रमाणात आहे, असेही ते म्हणाले.

टेस्टिंगची संख्या दीड हजारावर नेणार – जिल्हाधिकारी

सांगली जिल्ह्यातील कोरोना स्थितीची सविस्तर माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, सध्या दररोज एक हजार कोरोना टेस्ट होत असून, कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, कोरोना टेस्टिंगची संख्या एक हजार 500 करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात शासनाने निर्देशित केलेल्या उपाययोजनांची संबंधित यंत्रणांकडून कडकपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.