सायरस मिस्त्री टाटा समूहाच्या अध्यक्षपदी राहू शकत नाहीत- सर्वोच्च न्यायालय

Share This News

नवी दिल्ली, 26 मार्च : सायरस मिस्त्री टाटा समूहाच्या अध्यक्षपदावर राहू शकत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. टाटा समूह आणि सायरस मिस्त्री यांच्यात 5 वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालामुळे पडदा पडला आहे.  सायरस मिस्त्री यांना 2016 मध्ये टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून हटवण्यात आले होते. याविरोधात सायरस मिस्त्री यांनी कायदेशीर आव्हान दिले होते. डिसेंबर 2019 मध्ये एनसीएलएटीने मिस्त्रींना अशा पद्धतीने पदावरून काढण्याच्या निर्णयाला चुकीचे ठरवले होते. तसेच मिस्त्री यांना पुन्हा पदावर बहाल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. एनसीएलएटीच्या या निर्णया विरुद्ध जानेवारी 2020 मध्ये टाटा समूहाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने एनसीएलएटीचा निर्णय रद्द ठरवला होता. दुसरीकडे शपूरजी पालनजी ग्रुपनेही सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितलं होतं की मिस्त्रींना ज्या नियमांच्या आधारे काढण्यात आलं होतं त्या नियमांना एनसीएलएटीने रद्द केले नव्हते. त्यामुळे भविष्यातही असा निर्णय होऊ शकत असल्याचे मिस्त्री यांनी म्हंटले होते. मिस्त्रींच्या नियंत्रणाखाली असलेल्या शपूरजी पालनजी ग्रुपची टाटा समूहामध्ये 18.4 टक्के हिस्सा आहे. मिस्त्री यांनी अशीही मागणी केली होती की त्यांना टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांमधील 18.4 टक्क्यांचा हिस्सा मिळावा. यावर सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कोणताही आदेश दिला नाही.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.