शहरातील शाळा-महाविद्यालये ३ जानेवारीपर्यंत बंदच

Share This News

दहावी, बारावी पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल नाही

नागपूर :  शहरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महापालिका क्षेत्रातील महापालिका, जिल्हा परिषदसह खाजगी शाळा व विद्यालये ३ जानेवारी २०२१पर्यंत बंदच राहणार आहेत. यासंबंधी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी आदेश निर्गमित केले आहेत. विशेष म्हणजे,  इयत्ता १०वी आणि १२वीच्या पुरवणी परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे सुरूच राहतील, असेही  आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

महापालिका प्रशासनाने यापूर्वी १३ डिसेंबरला शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. महापालिका क्षेत्रामध्ये करोनाचा प्रादुर्भाव काही अंशी नियंत्रणात आहे. मात्र जागतिक स्तरावरील करोनाच्या उद्रेकाचे अवलोकन केले असता धोका कायम नाही.  दिवाळीनंतर शहरामध्येही  बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे  ३ जानेवारी २०२१ पर्यंत शाळा बंदच ठेवण्याचे नवीन आदेश आयुक्तांनी दिले आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाईन शिक्षण पूर्ववत सुरू राहील.

आदेशाच्या अंमलबजावणी संदर्भात महापालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे जबाबदार अधिकारी यांनी समन्वयन आणि संनियंत्रण करावयाचे आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास किंवा विरोध दर्शवल्यास संबंधिताविरुद्ध साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय/कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.