नऊ महिन्यानंतर ग्रामीण भागात शाळा सुरू; करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन

Share This News

नागपूर : करोनाच्या भीतीचे सावट कायम असतानाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आज सोमवारी शाळेची वाट धरली. जिल्ह्यातील तेरा तालुक्यांतील ६४६ शाळांमधील १ लाख २८ हजार ६८९ विद्यार्थ्यांमधून केवळ १६ हजार १९८ विद्यार्थ्यांची पहिल्या दिवशी उपस्थिती होती. एकूण विद्यार्थी संख्येच्या तुलनेत उपस्थितांची संख्या केवळ बारा टक्के असली तरी शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह मात्र शंभर टक्के जाणवत होता.

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून २९ हजार ४०० पालकांचे संमतीपत्र  घेण्यात आले. मात्र संमतीपत्र देऊनही केवळ १६ हजार १९८ विद्यार्थी उपस्थित होते. याशिवाय ५ हजार ७७९ शिक्षकांपैकी ४ हजार ७७२ शिक्षकांनी हजेरी लावली. ५३ शिक्षकांचा करोना अहवाल सकारात्मक आला आहे.

सकाळच्या सत्रात शाळा सुरू झाल्या. विद्यार्थी शाळेत दाखल होताना त्यांची तपासणी करण्यात आली. शिवाय मुखपट्टीची सक्ती करण्यात आली.

करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करून शाळा सुरू करण्यात आल्या. शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी असली अनेक महिन्यांनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

प्रश्नमंजूषा फोनवर मिळणार

दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप बेस डिजिटल होम असिस्टंट या स्वाध्याय उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पायाभूत स्वाक्षरता व संख्या ज्ञान वाढवण्यासाठी प्रश्नमंजूषा फोनवर उपलब्ध करून देण्यात येत असून या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांसाठी ९१८५९५५२४५१५ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर विद्यार्थ्यांनी हॅलो किंवा नमस्कार असे पाठवून  या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर विचारल्या गेलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरेसुद्धा द्यायची आहेत.

‘सीबीएसई’ शाळा बंदच

जिल्हा परिषदेच्या नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या तरी शहराबाहेर असलेल्या बहुतांश सीबीएसई शाळांना पालकांनी प्रतिसाद न दिल्याने शाळा बंदच होत्या. शहरालगत असलेल्या बेसा, बेलतरोडी, हिंगणा, वाडी, पाचगाव, कापसी महालगाव, कळमेश्वर आणि इतर लगतच्या भागात बऱ्याच नामवंत सीबीएसई शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये शहरातील ६० हजारांवर विद्यार्थी शिकतात.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.