साहित्य अकादमीची मोहर… “उद्या” वर… त्यानिमित्ताने …!! Seal of Sahitya Akademi … on “tomorrow” … for that reason … !!

Share This News

मराठी भाषा ही जगात दहाव्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे. तर देशात तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाते.म्हणजे जवळ जवळ 8.3 कोटी लोक मराठी बोलतात. म्हणजे जर्मनी या देशाच्या एकूण लोकसंख्ये इतके लोक मराठी बोलतात. एवढी लोक मराठी भाषा बोलतात… त्या मराठी भाषेच्या जन्माचा इतिहास 2 हजार 300 वर्षाचा आहे. प्राकृत भाषा महाराष्ट्री, शौरसेनी,पाली, मागदी, अर्ध मागदी, पैशाची, यांचा उदय लॅटिन भाषेपेक्षा जुना असावा. त्यातल्या महाराष्ट्री या प्राकृत भाषेतून आजच्या मराठीचा उदय झाला आहे. एवढी जूनी भाषा असूनही मराठी ज्ञान भाषा का झाली नाही यात प्राचीन अनेक इतिहासाचे संदर्भ आहेत मी त्यात जाणार नाही कारण इतिहास सनावळीत आणि दैवीकरणात मरतो हे अनेक संदर्भाने सिद्ध होते. भारतातील बोली भाषा ज्ञान भाषा व्हाव्यात या उद्दात हेतूने 12 मार्च 1954 ला साहित्य अकादमीची स्थापना झाली. मराठीतल्या विविध साहित्य प्रकारात आज पर्यंत 62 ते 63 साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले आहेत.
साहित्यातला अजून एक खूप मानाचा पुरस्कार समजला जातो तो ज्ञानपीठ, आता पर्यंत मराठीतल्या चार कलाकृतीना दिला गेला आहे. आपल्या पेक्षा अधिक कन्नड मधल्या कलाकृतीना मिळाला आहे.
लोकसंख्येत आपण जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचे देश असूनही ऑलिम्पिक पदक विजेत्या तलिकेत खूप खालचा क्रमांक येतो… तसेच या बाबतीतही आहे. मराठी भाषिक म्हणून देशात तिसऱ्या क्रमांकावर आहोत.पुस्तकं दर्जेदार निघतात पण तिथं पर्यंत जाताना जो प्रचार आणि प्रसार व्हावा लागतो तो होतं नसावा… खरं तर मी यातला अभ्यासू माणूस नाही पण मराठी मातृभाषेवरच्या मातृभावातून हे लिहतो आहे, ती पोटतिडक दुसऱ्या भाषेचा दुस्वास नाही हे कृपया लक्षात घ्यावे.
काल 12 मार्च या वर्धापन दिनी साहित्य अकादमीने विविध भाषेतील पुस्तकांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर केले. त्यात मनोविकास प्रकाशन संस्थेनी प्रकाशित केलेली श्री.नंदा खरे यांची “उद्या” ही कादंबरी आणि बाल साहित्यासाठी आबा महाजन यांना हे पुरस्कार मिळाले…!!
12 मार्च 1954 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कल्पनेतून साकारलेल्या साहित्य अकादमी ने आज पर्यंत उत्तम काम केले आहे. त्यामुळे या पुरस्कारांना अनन्य साधारण असे महत्व आहे.

प्रकाशक दुर्लक्षित नको :-
चित्रपटाचे यश जेवढे कथाकारचे असते तेवढेच यश किंवा अधिक मोठे यश दिग्दर्शकाचे असते. गवागवा पण दिग्दर्शकाचा होतो पण साहित्यात जेवढे योगदान साहित्यिकाचे आहे तेवढेच मोठे योगदान प्रकाशकाचे असते ते मात्र दुर्देवाने आपल्याकडे जोखले जात नाही. त्यामुळे चांगले प्रकाशक उत्तम कलाकृती प्रकाशित करूनही म्हणावे तेवढे त्यांचे चीज होतं नाही. त्यामुळे त्यांचा उत्साह दुणावत नाही. लेखकांची कलाकृतीचा गौरव व्हावा पण प्रकाशकांचे योगदान दुर्लक्षित होऊ नये.

श्री. नंदा खरे सर यांनी पुरस्कार स्विकारावा :-
हा पुरस्कार कोणत्याही संस्थेचा अथवा संघटनेचा नाही. हा पुरस्कार देशाचा आहे पर्यायाने भारतातील लोकांचा पुरस्कार आहे. इतर पुरस्काराबद्दल त्यांच्या मतांचा आदर करतो मात्र हा देशाचा पुरस्कार असल्यामुळे त्यांनी तो स्विकारावा… मी माझ्या मातृभाषेवर अतिशय प्रांजळ प्रेम करतो आणि त्या भाषेत लिहणाऱ्या लेखकांबद्दलही मनात कमालीचा आदर असल्यामुळे त्या आदरातून ही विनंती आहे.
युवराज पाटील


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.