ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. आशा सावदेकर यांचं निधन

Share This News

नागपूरः ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. आशा सावदेकर यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं. ७२ वर्षीय डॉ. सावदेकर यांना मागील दोन तीन वर्षांपासून विस्मरणाचा आजार होता. त्यांच्या पश्चात मुलगा अश्वीन सावदेकर हा असून तो अमेरिकेत डेनव्हर येथे राहत असल्याने डॉ. सावदेकर यांच्यावर त्यांची देखभाल करणारे डॉक्टर अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती देण्यात आली. डॉ. सावदेकर यांची कोरोना चाचणी व्हायची होती, असेही सांगण्यात आले.
डॉ. सावदेकर यांचे पती अरविंद यांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर मुलगी अपर्णा दासगुप्ता हिचे ह्रदयविकाराने निधनामुळ त्या मानसिकरित्या खचलेल्या होत्या. त्यानंतर त्या त्यांच्या मुलीच्या कुटुंबीयांसोबतच सोनेगाव एचबी इस्टेट येथे राहात होत्या.
नागपुरातील भिडे कन्या शाळेत त्यांचे माध्यमिक शिक्षण पार पडले होते. तर नागपूर महाविद्यालयातून त्यांचे बीए आणि एमए (मराठी) शिक्षण झाले होते. १९७५ साली कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांच्या चिकित्सक अभ्यासावर पीएचडी मिळवली. त्यानंतर हा शोधप्रबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. ‘कविता विदर्भाची’ या ग्रंथात त्यांनी विदर्भातील निवडक कवींच्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांचे संकलन केलं आहे. कथाकार पु.भा.भावे, कादंबरीकार ना.सी.फडके, कवी ज.के.उपाध्ये यासह अनेक साहित्यिकांच्या साहित्याची त्यांनी चिकित्सक समीक्षा केली. त्यावर आधारित ‘पु.भा.भावे: साहित्यवेध’, ‘भारतीय साहित्याचे शिल्पकार: ना.सी.फडके’, ‘मुशाफिरी’ ही पुस्तके प्रकाशितही झाली आहेत. ‘मुशाफिरी’ या नावाने मराठी कवितेची समीक्षा करणारा त्यांचा ग्रंथ २००० साली प्रकाशित झाला होता. त्यांच्या निधनाने वैदर्भीय साहित्य वर्तुळात शोककळा पसरली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.