शरद पवार आपल्या विश्वासू नेत्यावर देणार गृहमंत्र्याची जबाबदारी?

Share This News

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेलं पत्र लिहिल्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. विरोधी पक्षानेही महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. या सर्व गोष्टींमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह संजय राऊत दिल्लीला शरद पवारांच्या निवासस्थानी बैठकीसाठी उपस्थित आहेत.अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असल्याने पक्षातर्फे अनिल देशमुखांवर लागलेल्या आरोपांमुळे त्यांचा राजीनामा घेतला जातो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत यावर बोलताना पक्षाच्या नेत्यांशी बोलून निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यानंतर गृहमंत्रीपद नेमकं कुणाकडे जाणार? यासाठी अनेक नावांची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचंही नाव गृहमंत्रीपदासाठी चर्चेत आहे.

परमबिर सिंह यांनी केलेल्या आरोपांचं प्रकरण लक्षात घेऊन शरद पवार हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाचा गृहमंत्रीपदासाठी विचार करू शकतात अशी चर्चा सुरू आहे. दिलीप वळसे-पाटील हे आपल्या शांत, संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळे, आता गृहमंत्र्यांवर झालेल्या गंभीर आरोपांनंतर अशा एखाद्या व्यक्तीला गृहमंत्री करण्याचा विचार शरद पवार करू शकतात, असं वृत्त एका वृत्तपत्राने प्रकाशित केलं आहे.अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर, गृहमंत्रीपद नेमकं कुणाकडे जाणार? यासाठी मोठ्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर देशमुखांच्या राजीनाम्यावर येत्या दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं स्वतः शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाचा पर्याय राष्ट्रवादीसमोर असल्याने पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.