‘एटीएसने जप्त केलेली ‘ती’ व्हाेल्वो फडणवीसांच्या गुडबुक्समधील व्यक्तीची’; राष्ट्रवादीचा आरोप

Share This News

मुंबई – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं पाहायला मिळत आहे. याबरोबरच दररोज फडणवीस या प्रकरणात नवीन गोष्टींचा उलगडा करत आहेत. आता फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी राष्ट्रवादीनेही पुढाकार घेतल्याचं दिसून येतंय.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून दहशतवाद विरोधी पथकाने आज जप्त केलेली व्होल्वो गाडी ही देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयाची असल्याचा आरोप केला आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र एटीएसने जप्त केलेली व्होल्वो मनीष भतीजाची असल्याचं कळतंय. मनीष भतीजा हे देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुक्समधले बिल्डर आहेत. तसेच त्यांचे लागेबांधे हे भाजप नेत्यांकडे जात असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने पुढे फडणवीसांवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री असताना नवी मुंबईतील 1,767 कोटी रुपयांची जमीन अवघ्या 3.6 कोटी रूपयाला मनीष भतिजा या बिल्डरच्या घशात घातली, असा आरोप सातत्याने झाला होता. त्यामुळे, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. असा संदर्भही दिला आहे.मनीष भतीजा यांच्या पॅराडाईस ग्रुपला नवी मुंबई विमानतळानजीकची 24 एकर सोन्यासारखी जमीन पडलेल्या भावाने दिली. असा आरोप राष्ट्रवादीने फडणवीसांवर केला. त्याबरोबरच, मनीष भतिजा यांचे प्रसाद लाड हे व्यवसायिक पार्टनर असल्याचाही मोठा खुलासा या फेसबुक पोस्टमध्ये करण्यात आला आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादीने टीकेची झोड उठवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलंच ढवळुन निघालं आहे.

एटीएसच्या तपासामुळे कहानी में ट्विस्ट
महाराष्ट्र एटीएसने जप्त केलेली व्होल्वो मनिष भतिजांची?
मनिष भतिजा देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुक्समधले बिल्डर.

मनसुख हिरेन तपासात महाराष्ट्र एटीएसच्या नव्या सुगाव्यामुळे कहानी में ट्विस्ट आला आहे. एटीएसने तपासादरम्यान जी व्होल्वो कार ताब्यात घेतली आहे ती बिल्डर मनिष भतिजा यांची असल्याचे समजते. मनिष भतिजा यांचे राजकीय व व्यावसायिक लागेबांधे भाजपा नेत्यांकडे जातात.

याच मनिष भतिजा यांच्या पॅराडाइज ग्रुपला फडणवीस मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळानजीकची सोन्यासारखी २४ एकर प्राइम लँड पडेल भावाने दिली होती. इतका हा मनिष भतिजा फडणवीसांच्या जवळचा आहे आणि फडणवीसांचे अत्यंत लाडके ज्यांना त्यांचा ब्लू आइड बॉय म्हणून ओळखले जाते त्या प्रसाद लाड यांचे हे मनिष भतिजा व्यावसायिक पार्टनर असल्याचे समजते.

नवी मुंबईतील सुमारे १७६७ कोटी रुपयांची ही जमीन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या ३.६ कोटी रुपयांत मनिष भतिजा यांच्या घशात घातली, असा आरोप सातत्याने झाला होता. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली होती.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माध्यमांमध्ये वेगवेगळ्या राजकीय भूमिका उठत असताना पोलिस तपासात मात्र वेगळी तथ्ये सामोरी येत आहेत. या प्रकरणातले इतर पुरावे आता महाराष्ट्र पोलिसांच्या तपासामुळे बोलू लागले आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.