शिर्डी साई संस्थान व शिर्डी ग्रामस्थ पुन्हा एकदा आमने-सामने, दर्शनावरून वादाला सुरुवात

Share This News

शिर्डी : शिर्डीत ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नविन वर्षाच्या प्रारंभी वाद झाल्याने नगराध्यक्षांसह अनेक गावकऱ्यांना दर्शनासाठी मंदिरात न जाता कळसाचे दर्शन घेणे पसंत केले. तर या सर्व प्रकरणी संस्थानच्या वतीनं पोलिसांना तक्रार दिली असून आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहण महत्वाचं आहे.

आगामी वर्ष सुख आणि समृद्धीचं जाव म्हणून थर्टी फस्टच्या मध्यरात्री अनेक शिर्डीकर अनेक वर्षांपासून साईबाबांच्या मंदिरात जावून बाबांचे आशीर्वाद घेतात. नविन वर्षात नव चैतन्य मिळो म्हणून साईंच्या मंदिरात हजेरी लावतात. मात्र, यंदा संस्थान प्रशासनाच्या धोरणामुळे अनेक शिर्डीकरांना नविन वर्ष प्रारंभाला मंदिरात जात आलं नाही. शिर्डीचे नवविर्वाचित नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी विश्वस्त तथा शिवसेनेच्या नगरसेविका अनिता जगताप, माजी विश्वस्त सचिन तांबे, नगरसेवक सुजीत गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांच्यासह अनेक शिर्डीकरांना मुख्यकार्यकारी आधिकारी कान्हूराज बगाटे यांनी साईमंदिरात जाताना रोखले.

अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा ग्रामस्थांचा आरोप
तुम्हाला सर्वात प्रथम सोडतो अस म्हणत हुल देवून कार्यकारी आधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना शनिगेट जवळून बाहेर काढले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि मुख्य कार्यकारी बगाटे यांच्यात बराच वेळ तू तू मै मै देखील झाली. बराच वेळ गोंधळ झाल्यानंतर ग्रामस्थांचा रोष पाहता मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिलगीरी व्यक्त केली. मात्र, ग्रामस्थांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याने अनेक ग्रामस्थांनी मंदिरात न जाता बाहेरूनच साईंच दर्शन घेत मुख्य अधिकारी बगाटे यांच्या वागणुकीचा निषेध केला आहे.

नविन वर्षा निमित्तानं आपण साईबाबांच दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. फक्त दर्शन घेवू द्या एवढीच प्रांजळ मागणी आम्ही करत होतो. मात्र, तरीही शिर्डीकरांना आत सोडले नाही. मात्र, त्यांच्या सोबतच्या व्हिआयपींना त्यांनी सोडले, असा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका अनिता जगताप यांनी केला आहे.

ग्रामस्थांना मंदिरात जाण्यापासून रोखलं
31 डिसेंबरच्या मध्यरात्री म्हणजे साधारण साडेअकरा वाजता काही ग्रामस्थ, मानकरी आणि पदाधिकारी शनिगेट जवळील प्रशासकिय व्दाराजवळ जाऊन थांबले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी धावत येवून तुम्ही येथे कसे आलात. चला मागे चला अस म्हणत काही पदाधिकाऱ्यांना खेचण्यास सुरुवात केली. ऐवढचं नव्हे तर कॅमेरा चित्रीकरण सुरु ठेवले. आणि सर्व ग्रामस्थांना त्याठिकाणाहून बाहेर काढले. त्यानंतर मोठा लवाजामा घेवून बगाटे पुन्हा शनिगेटकडे गेल्यानं शिर्डी ग्रामस्थांनी त्यांचा निषेध केलाय.

ड्रेसकोडचा वाद, काकड आरतीसाठी पैशाची मागणी, प्रसारमाध्यमांवरील अनेक निर्बंध आणि आता साई दर्शनाहुन ग्रामस्थ आणि कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये सुरू झालेल्या वादाने साईंची शिर्डी नगरी आता वादाची नगरी ठरतेय की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.