यवतमाळ येथे शिवसेनेचे पिकविमा कंपनीविरोधात जवाब दो आंदोलन
अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकर्यांना यंदा पिकविमा कंपनीने गळा घोटला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार २१ शेतकर्यांची फसवणूक करणार्या पिकविमा कंपनीविरुद्ध शेतकर्यांच्या आंदोलनात शेतकर्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार भावना गवळी यांनी केले आहे. शेतकरी हा देशाचा पाठीचा कणा आहे आणि तो कणा वाकता कामा नये. यासाठी दिल्लीत आपले शेतकरी बंधू आणि भगिनी आपल्या हक्कासाठी कुडकुडत्या थंडीत आंदोलन करीत आहे. तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील शेती पूर्ण उद्ध्वस्त झाली असताना, या शेतकर्यांना पीकविमा नाकारण्यात आल्याने विमा कंपनीला जाब विचारण्यासाठी हे आंदोलन आहे. निसगार्ची होणारी अवकृपा लक्षात घेता जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार शेतकरी बांधवांनी पिकविमा काढला होता. यवतमाळ जिल्ह्यामध्ये इफको टोकीओ जनरल इन्शुरन्स कंपनीत १६७ कोटी रुपये पीकविमा जमा झाला. मात्र, या विमा कंपनीने नियमांच्या निकषावर बोट ठेवून सोयाबीन कापूस तसेच अन्य पिकांचा विमा कंपनीने शेतकर्यांना न दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या कंपनीच्या फसव्या निकषानुसार यवतमाळ जिल्ह्यातील फक्त ९ हजार ७७६ शेतकर्यांना ९ कोटी ३८ लाख रुपयांचे वाटप केले आहे. जिल्ह्यातील ४ लाख ५७ हजार २४५ शेतकर्यांनी हप्त्यापोटी भरलेले १५८ कोटी रुपये निकषावर बोट ठेवून हडपण्याचा प्रयत्नही विमा कंपनी करीत आहे. तरी दारव्हा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या हक्काची मागणी घेऊन विमा कंपनीच्या विरोधात यवतमाळ येथे २८ डिसेंबर रोजी सोमवारला ठिक ११ वाजता टिंबर भवन स्टेट बँक चौक येथे शेतकरी जवाब दो आंदोलनात सहभागी व्हावून पिकविमा कंपनीविरोधात आपला रोष व्यक्त करावा, असे आवाहन वाशीम- यवतमाळ खासदार भावना गवळी यांनी केले आहे. |