शिवकुमार निलंबित, रेड्डींची मुख्यालयात हजेरी

Share This News

नागपूर : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी प्रमुख आरोपी असलेले उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना निलंबित करण्यात आले आहे. चव्हाण यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणारे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांची बदली करण्यात आली असून त्यांना पुढील आदेशापर्यंत नागपूर येथील वनविभागाच्या मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्य शासनाने शुक्रवारी सायंकाळी हे आदेश दिले. शिवकुमार यांच्या विरोधात धारणी येथे गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांचा कार्यभार मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागाचा उपवनसंरक्षक अविनाश कुमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दीपाली चव्हाण यांनि शिवकुमार यांच्या वर्तणुकीबाबत वेळोवेळी अवगत करूनही क्षेत्र संचालक रेड्डी यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. ही बाब गंभीर आहे. त्यांना त्यांच्या पदावरून अन्यत्र पाठविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ही पदस्थापना होईपर्यंत त्यांनी नागपूरला वनबलप्रमुखांच्या कार्यालयात हजर राहून पुढील आदेशाची प्रतीक्षा करावी, असे राज्य शासनाने काढलेल्या आदेशांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या पदाचा कार्यभार अमरावती प्रादेशिक वन विभागाचे मुख्य वन संरक्षक प्रवीण चव्हाण यांना सोपविण्यात आला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.