धक्कादायक…सहकाऱ्यांनीच केली मेट्रो कामगाराची हत्या
नागपूर : सोबतचा सहकारी सातत्याने आपल्याला कामावर राबवून घेत असल्याचा राग काढत तिघांनी एकत्र येत मेट्रोच्या एका कामगाराची हत्या केली. सम्हारू अवधू हरीजन (वय ६०) हे मृतकाचे नाव आहे. सम्हारू उत्तर प्रदेशातील देवरीया येथील रहिवासी आहे.
दिनेश मुन्ना लाला (वय २३), बजरंगी लालचंदप्रसाद गौतम (वय १९) आणि सुशीलकुमार दीपचंद गौतम (वय १९, रा. सर्व मोहम्मदपूर, शहाजानपूर, उत्तर प्रदेश) या तीन जणांवर सम्हारूच्या खुनाचा आरोप आहे. गुरुवार, १८ फेब्रुवारीला रात्री आठ वाजताच्या सुमारास खुनाची ही घटना घडली. सम्हारू आणि तीनही आरोपी मेट्रो कंत्राटदार संजीवा यांच्याकडे कामाला आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील येणाऱ्या लोकमान्यनगरात ते वास्तव्यास होते. सम्हारु सोबत असलेल्या कामगारांना कामाचे वाटप करायचे. गुरुवारी त्यांनी आरोपींकडून दिवसभर काम करून घेतले. त्यानंतर सम्हारू यांनी त्यांना रात्रपाळीचेही काम दिले. त्यामुळे तीनही कामगार संतापले. त्यांचा सम्हारुशी वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने त्यांनी सम्हारूवर चाकुने हल्ला केला. यात सम्हारु यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पळून गेले. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी तपास करीत दुसऱ्या राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तीनही आरोपींना कामठी परिसरातून अटक केली.