धक्कादायक ! आजीनेच करायला लावले चिमुकल्या नयनचे अपहरण

Share This News

अमरावती : शारदानगरातून बुधवारी अपहरण करण्यात आलेल्या नयन मुकेश लुणीया या चार वर्षीय बालकाची अहमदनगर येथून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पोलिसांनी सुटका केली आहे. नयनला अमरावतीत आणत त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या अपहरण प्रकरणाची मुख्य सूत्रधार नयनची आजीच असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
याप्रकरणात राजापेठ पोलिसांच्या पथकाने अहमदनगर पोलिसांच्या मदतीने बंबईया उर्फ उर्फ अल्मश ताहीर शेख (१८, रा. कोठला), मुसाहीब नासीर शेख (२१, रा. मुकुंद नगर), आसीफ युसूफ शेख (२४, कोठला), फिरोज रशीद शेख (२५, कोठला), हिना (वय २५) यांना अटक केली. शनिवारी याप्रकरणातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या नयनच्या आजी मोनिका लुणीया(वय ४७) यांना पोलिसांनी अटक केली. नयनच्या आजीनेच अहमदनगर येथील २५ वर्षीय मैत्रिणीच्या मदतीने अपहरणाचा कट रचल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. अहमदनगर येथून अटक करण्यात आलेली व अपहरण करणारी युवती ही नयनच्या घरी नेहमी येणे-जाणे करायची. ती १५ ते २० दिवस नयनच्या घरी राहत होती. त्यामुळे तिची नयनसोबत चांगली ओळख झाली. नयनच्या आजीने खंडणीसाठी हा कट रचला होता. दोन महिन्यांपासून यासाठी नियोजन करण्यात आले होते. कोठला झोपडपट्टीत राहणारी आरोपी युवती व अन्य सहा जणांना यात सहभागी करण्यात आले होते. नयनच्या आजीची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीतून आणखी सत्य बाहेर येईल, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
अपहरण करणारी युवती व अन्य पाच सराईत गुन्हेगार आहेत. या सर्वांवर बालकांच्या अपहरणांचे गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने २८ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नयनच्या सुटकेसाठी व आरोपींच्या अटकेसाठी कामगिरी बजावणारे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचेसह अहमदनगर येथील अधिकारी, कर्मचारी यांना प्रत्येकी ५० हजार रूपयाचा पुरस्कार पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी जाहीर केला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.