ग्रामीण भागात जाणवतेय डॉक्टरांची कमतरता

Share This News

चिमूर
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने ग्रामीण भागात पाय रोवले आहे. परंतु डॉक्टरांची कमतरता जाणवत असल्याने रुग्णांवर वेळेत उपचार मिळणे कठीण झाले आहे. काहीजण भीतीपोटी रुग्णालयात जात नसल्याचीदेखील माहिती आहे.
ग्रामीण भागातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून असतात. सर्दी, खोकला, ताप आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार घेतात. परंतु, पॉझिटिव्ह रिपोर्ट येईल, या भीतीने नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यास कुचराई करतात. प्राथमिक आरोग्य केंद्रातून सरळ तालुक्याच्या ठिकाणी पाठविले जाते. शिवाय मृत्यू ओढवल्यास नातेवाईकांना मृतदेह मिळत नसल्यामुळे घरी उपचार करण्यावर प्राधान्य देतात. सध्या ग्रामीण भागात व्हायरल फ्लूने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, टायफाइड रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांची संख्या अल्पप्रमाणात असल्यामुळे रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळत नाही. शिवाय दवाखान्यात गर्दी वाढलेली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे डॉक्टर खबरदारी बाळगत आहेत. कोरोनाच्या टेस्टशिवाय उपचार करण्यास तयार होत नाहीत. ग्रामीण भागात उच्चशिक्षित डॉक्टर वैद्यकीय सेवा देण्यास कुचराई करतात. शिवाय ग्रामीण भागात दवाखाने उघडत नाही. शहरी भागात वैद्यकीय सेवा देण्यास प्राथमिकता देतात. ग्रामीण भागात बीएएमएस, बीएचएमएस आदी अहर्ताधारक डॉक्टर दवाखाने उघडून वैद्यकीय सेवा पुरवितात. तालुक्याच्या ठिकाणी चार-पाच एमबीबीएस डॉक्टर वैद्यकीय सेवा पुरवतात.
हजारो लोकसंख्येच्या मागे डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे वेळेवर योग्य उपचार मिळत नाही. अशावेळी रुग्ण बोगस डॉक्टरांकडून उपचार करून घेत असल्याचेही दिसत आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.