अमरावतीच्या बेलोरा विमानतळासाठी साडेसहा कोटी Six and a half crore for Belora Airport in Amravati

Share This News

अमरावती : अमरावती येथील बेलोरा विमानतळाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी ६.४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर निधी मंजूर करण्यात आल्याचे पत्र शासनाने काढले आहे.
राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला सरकारकडून निधी देण्यात येतो. त्यानुसार राज्य सरकारने २०२०-२१ या वर्षासाठी विमानतळांना १२८ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यात अमरावती विमानतळासाठी सव्वादोन कोटी रूपयांची तरतूद होती. विमानतळाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी निधीची गरज होती. त्यामुळे अॅड. ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे आता अमरावतीला वाढीव निधी मंजूर करण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यातील वस्त्रोद्योग पार्क व औद्योगिक विकासाच्या दृष्टीने बेलोरा विमानतळ सुरू होणे व येथुन विमानसेवा उपबल्ध होणे गरजेचे झाले आहे. वाढीव निधीतून बेलोरा विमानतळाच्या विकासाच्या कामांना गती येणार आहे. वाढीव निधीतून धावपट्टी, संरक्षण भिंत आदी कामांना गती मिळेल, असे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक गौरव उपशा यांनी सांगितले.
धावपट्टीचे विस्तारीकरण, टॅक्सी-वे, अप्रॉन, आयसोलेशन-बे, पेरीफेरल रोड, जीएसई एरीया, स्वच्छता यंत्रणा आदी कामे ७० टक्के पूर्ण झाली आहेत. प्रशासकीय इमारत व इतर काही कामे प्रलंबित होती. ती आता पूर्ण करण्यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे, असे उपशा यांनी सांगितले.

बेलोरा विमानतळाचे स्वरूप

  • स्थापना : १९९२
  • एमआयडीसीला हस्तांतरण : १९९७
  • महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला हस्तांतरण : फेब्रुवारी २०१४
  • भारतीय विमानतळ प्राधिकरणाला लीज : ६० वर्षांसाठी
  • अमरावती शहरापासून अंतर : १५ किलोमीटर
  • सध्याचे क्षेत्रफळ : ७४.८६ हेक्टर
  • सध्याची धावपट्टी : ४५०० फूट
  • विस्तारीत धावपट्टी : २५०० फूट
  • कोणत्या प्रकारातील विमान उतरू शकते : एअर बस ए-३२०


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.