कृषी कायद्यांच्या विरोधात नारेबाजी
नागपूर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या कृषी कायद्यांना विरोध व्यक्त करण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर गुरुवारी नारेबाजी करीत रेल्वे स्थानकात शिरण्याचा प्रयत्न आंदोलकानी केला. रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांनी आंदोलकांना वेळीच स्थानकाबाहेर रोखल्याने रेल रोकोचा प्रयत्न फसला.
किसान मोर्चाने जाहीर केलेल्या देशव्यापी कार्यक्रमानुसार किसान सभा, महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनीयनचे पदाधिकारी सकाळी घोषणाबाजी करीत नागपूर रेल्वे स्थानकाच्या परिसरात पोहोचले. ‘कृषी कानून वापस लो..’ आदी नारेबाजी करीत या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकात शिरण्याचा प्रयत्न केला. संतप्त आंदोलकांना रेल्वे पोलिसांनी मुख्य प्रवेश द्वारावरच अडविले. त्यातील काही कार्यकर्त्यांनी इतर मार्गांनी फलाटावर शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी वेळीच रोखले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून नागपूर, अजनी, इतवारी रेल्वे स्थानकावरील प्रवेश मर्यादीत करण्यात आला आहे. तीनही स्थानकांवर केवळ कन्फर्म रिझर्वेशन असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकांमध्ये प्रवेशाचे इतर मार्ग बंद करण्यात आले आहेत. परिणामी गुरुवारी झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांना आवरण्यात जीआरपी आणि आरपीएफच्या पोलिसांना यश आले.