नागपूर :अंबाझरीच्या बंधार्याचे काम त्वरित सुरू करा
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अंबाझरी तलावाच्या झालेल्या दुरवस्थेबद्दल जल अभ्यासकांनी तलावाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. प्रकरणाची गंभीरता पाहता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठीत करण्यात आली आहे. ढासळण्याच्या स्थितीत पोहोचलेल्या तलावाच्या बंधार्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, असे आदेश समितीला देण्यात आले आहेत.
गुरुवारी प्राधिकरणाचे सदस्य बॅ. विनोद तिवारी, एस.डी. कुलकर्णी व एस.टी. सांगळे यांनी हा निर्णय सुनावला. प्राधिकरणाने सुनावणीदरम्यान मनपाच्या उदासीन व हलगर्जीपणाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. १८७0 मध्ये तयार करण्यात आलेल्या अंबाझरी तलावाचे पाणी गळती होत असल्याबाबत जल अभ्यासकांनी सोशल मीडियावर अनेक छायाचित्रांसह लेख पोस्ट केले होते. यावर प्राधिकरणाने स्वत:हून दखल घेत याचिका दाखल केली. मनपासमवेत सर्व प्रतिवादींना नोटीस जारी केली होती. ७ डिसेंबर रोजी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मनपाने प्राधिकरणाच्या अधिकार क्षेत्रावर आपत्ती दर्शविली होती. प्राधिकरणाला या प्रकरणात स्वत: दखल घेण्याचा अधिकार नाही, असेदेखील म्हटले होते. प्राधिकरणाने मनपाच्या हरकतींचे खंडन करीत प्रकरणाची सुनावणी केली व १0 डिसेंबर रोजी निर्णय सुनावला. बंधार्याची सुरक्षा व अतिक्रमणासंदर्भात अहवाल तयार करण्याचा निर्णयात आदेश देण्यात आला.