चंद्रकांत पाटील यांची नागपुरात टीका
राज्य सरकार मराठा व ओबीसींमध्ये फूट पाडतेय
नागपूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार ठोस भूमिका न घेता ओबीसी व मराठा समाजामध्ये फूट पाडून राजकारण करीत आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी नागपुरात केली.
विदर्भातील विविध जिल्ह्य़ांचा आढावा घेण्यासाठी पाटील मंगळवारी दुपारी नागपुरात आले असता ते विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारमधील तीनही पक्षांमध्ये मतभेद आहेत. ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद निमाण करण्याचे काम ते करीत आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार उठसूठ ओबीसींबाबत वक्तव्य करीत आहेत. आम्ही ओबीसी आणि मराठा समाजाचे आरक्षण स्वतंत्र ठेवले आणि ते न्यायालयात टिकवले. मात्र राज्य सरकार त्याबाबत निश्चित भूमिका घेत नसल्यामुळे दोन्ही समाजांमध्ये संभ्रमावस्था आहे. राज्यात संघटन मजबूत करण्यासाठी विविध जिल्ह्य़ात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
‘पदवीधर’बाबत आमची अजून तयारी नाही
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका अचानक जाहीर झाल्या. आमची त्या संदर्भात अजून तयारी झाली नाही. सतरा दिवसात तयारी कशी करणार, असा प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगाला निवेदन पाठवले आहे. पदवीधर व मतदार यादी प्रथम जाहीर करणे अपेक्षित आहे. मात्र निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
समीर ठक्कर प्रकरणी राज्य सरकारची दंडुकेशाही
समीर ठक्कर प्रकरणी राज्य सरकारची दंडुकेशाही सुरू आहे. ती सहन केली जाणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त महाविकास आघाडीतील लोकांसाठीच आहे का, असा सवालही पाटील यांनी केला.