नागपुरात कठोर लॉकडाऊनमध्ये ३१ मार्चपर्यंत वाढ

Share This News

पालकमंत्री नितीन राऊत यांची घोषणा
नागपूरः उपराजधानातील कोरोनाचा संसर्गाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात सर्वपक्षीय बैठकीनंतर केली.
नागपुरात १५ मार्चपासून कठोर लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनची मुदत उद्या रविवारी संपणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करून परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच व्हीसीच्या माध्यमातून गृहमंत्री अनिल देशमुख हे सहभागी झाले होते. या बैठकीत व्यापारी संघटना तसेच तज्ज्ञांसह सर्व लोकप्रतिनिधींचे विचार जाणून घेतल्यावर लॉकडाऊन ३१ मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिली.
नागपूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढत आहे. १५ मार्चला रुग्णांची संख्या दोन हजाराने वाढत असताना ती आता साडेतीन हजाराने वाढत आहे. मृतांची संख्याही सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कठोर निर्बंध कायम ठेवले जाणार आहेत. मात्र, रेस्टॉरेंट आणि खाद्यपदार्थांची विक्री सायंकाळी ७ पर्यंत तर खाद्यपदार्थांची ऑनलाईन विक्री रात्री ११ पर्यंत चालू ठेवण्याची मुभा राहणार आहे. रस्त्यावर अनावश्यक गर्दी अथवा फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना पोलिस विभागाला देण्यात आली आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रकार जाणून घेतोय

नागपुरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोरोनाचा नवा प्रकार आहे की कसे, हे जाणून घेण्यासाटी नागपुरातून दिल्लीच्या एका प्रयोगशाळेला नमुने पाठविले गेले आहे. त्याचा अहवाल अद्याप उपलब्ध झालेला नाही. अहवाल येत्या दोन दिवसा उपलब्ध करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.