कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी संदीप कदम

Share This News

भंडारा दि. 19:- महाराष्ट्र राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व आस्थापना टप्या-टप्प्याने सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत, त्याच धर्तीवर कोविड 19 चा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा जाणवत असून मुख्यमंत्री महोदयांनी 16 फेब्रुवारी 2021 रोजी दिलेल्या निर्देशाप्रमाणे खालील बाबींची अंमलबजावणी तसेच प्रमाणित कार्यप्रणाली मधील मार्गदर्शक सूचना व निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले. जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी यांची ऑनलाइन बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फारुखी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत ऊईके, मुख्याधिकारी विनोद जाधव यांची उपस्थिती होती.

 जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी नगरपरिषद, नगर पंचायत, संबंधित विभाग प्रमुख यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व मंगल कार्यालय, कोचिंग क्लासेस, खाजगी शाळा, अनुदानित व विना अनुदानित शाळा, विद्यालय महाविद्यालय,  हॉटेल्स, रेस्टॉरेंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, शॉपिंग मॉल्स, शॉपिंग कॉम्पलेक्स, पर्यटन स्थळे, उद्याने, बाजार, आठवडी बाजार व इतर गर्दी होणारी स्थळे या ठिकाणी वेळो -वेळी अचानक भेट देऊन तपासणी करावी. उपस्थित लोकांनी मॉस्क लावलेले नसेल, हँड सॅनिटायझरची उचित व्यवस्था नसेल किंवा शासनाकडून वेळो-वेळी निर्गमीत करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नसेल तर त्यांना प्रथम वेळी नोटिस देऊन उचित दंड आकारावा. त्याच ठिकाणी दुसऱ्या वेळेस जर अशीच परिस्थती राहिली तर संबंधित प्रतिष्ठान संस्था आस्थापना दुकान व्यक्तिवर गुन्हा दाखल करावा, अथवा सदर प्रतिष्ठान, संस्था व आस्थापना दुकान सील करण्याची कार्यवाही करावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्यांवर दंड आकारावा. असे निर्देश त्यांनी दिले.

 हॉटेल-लॉन, मंगलकार्यालय, सभागृहे, नाट्यगृहे या ठिकाणी लग्न समारंभ, वाढदिवस एंगेजमेंट कार्यक्रम, राजकिय कार्यक्रम, पार्टी, किंवा इतर कार्यक्रमांसाठी पोलीस विभागाची परवानगी घेणे बंधनकारक राहिल. या ठिकाणी प्रमाणित कार्यप्रणाली प्रमाणे क्षमतेपेक्षा जास्त नागरिक आढळल्यास, मास्कचा वापर न केल्यास, सुरक्षित सामाजिक अंतर न ठेवल्यास, हँड सॅनिटायझर व इतर स्वच्छतेचे आणि कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे मानक नसल्यावर हॉटेल लॉन, मंगलकार्यालय, सभागृहे, यांच्या संचालकावर तसेच कार्यक्रम आयोजकांवर दंड आकारुन गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, अध्यक्ष इंडियन मेडीकल असोशियेशन यांचे समवेत सर्व खाजगी प्रॉक्टीस करणाऱ्या डॉक्टारांची बैठक आयोजित करावी. सदर बैठकीत ज्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असतील व त्यांना असे वाटत असेल की रुग्णाला कोविड-19 रोगाची प्राथमिक लक्षणे दिसत असतील तर त्यांनी अश्या रुग्णांना ताबडतोब कोविड 19 ची टेस्ट करुन घेण्यासंबंधिच्या सूचना द्याव्यात. तसेच जिल्ह्यात उपलब्ध असलेले सर्व व्हेंटिलेटर चालु आहेत किंवा कसे याची खात्री करून द्यावी. रुग्णाच्या घरातील सर्वाची कोविड तपासणी करावी. भाजी मंडई, दुकानदार अश्या लोकांचा ठरावीत अंतराने नियमित कोरोना चाचण्या कराव्यात सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, ठरावीत अंतराने हाथ साबणाने स्वच्छ धुणे या विषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी व इंसिडेंट कमांडर यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या ccc सेंटर मधील कोविड-19 च्या अनुषंगाने उपलब्ध झालेली साधन सामुग्री सुस्थितीत असल्याची खात्री करावी व उपरोक्त सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.