विद्यार्थी तयार करणार 100 उपग्रह

Share This News

एकाच वेळी अवकाशात सोडण्‍याचा साधणार जागतिक विक्रम
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचा उपक्रम

नागपूर, 18 डिसेंबर
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांसाठी “स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१” चे आयोजन करण्‍यात आले असून या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून १००० विद्यार्थी १०० उपग्रह तयार करणार आहेत. हे उपग्रह एकाचवेळी अवकाशात प्रक्षेपित केले जाणार असून हा एक जागतिक, आशिया आणि भारत स्‍तरावरचा विक्रम ठरणार आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे सचिव मिलिंद चौधरी पत्रकार परिषदेत बोलताना म्‍हणाले, भारतात अशाप्रकारचा उपक्रम हा पहिल्‍यांदाच राबविला जात असून यात महाराष्‍ट्रातील विद्यार्थी मोठ्या संख्‍येने सहभागी होत आहेत. 5 वी ते 8 वी, 9 वी ते 12 वी आणि डिप्लोमा, बीएस्सी, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असे या उपक्रमाचे तीन गट करण्‍यात आले आहेत. 10 विद्यार्थ्यांचा एक समूह 1 उपग्रह तयार करणार आहे. या उपक्रमात ज्या शाळा 10 विद्यार्थ्यांचा समूह नोंदणी करतील त्या शाळांना कलाम कुटुंबीयातर्फे सन्मानपत्र दिले जार्इल. जे शिक्षक आपला स्वतंत्र 10 विद्यार्थ्यांचा समूह नोंदणी करतील त्यांनाही सन्मानपत्र दिले जाणार आहे. शिवाय प्रत्‍येक विद्यार्थ्‍यालादेखील प्रमाणपत्र दिले जाईल.
असे असतील उपग्रह
हे विद्यार्थी जगात सर्वात कमी वजनाचे (25 ग्रॅम ते ८० ग्रॅम ) 100 उपग्रह तयार करतील. या उपग्रहांना 35,000 ते 38,000 मीटर उंचीवर हायअल्टीट्युड सायन्टिफिक बलूनद्वारे प्रस्थापित केले जाणार आहे. हे उपग्रह एका केसमध्ये फिट केलेले असतील. या केससोबत पॅराशूट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल. हे सर्व 100 उपग्रह 7 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता रामेश्‍वरम येथून प्रक्षेपित केले जातील. विद्यार्थ्‍यांना उपग्रहांचे प्रक्षेपण आणि तेथून उपग्रहाद्वारे पाठविण्‍यात येणारी माहिती घरी बसल्‍या ऑनलाईन बघता येईल.
खास मराठीतून प्रशिक्षण


महाराष्ट्रातील मुलांसाठी खास मराठीमधून प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज प्रकारचा उपग्रह म्हणजे काय? त्याचे विविध भाग कुठले? त्यांचे कार्य कसे चालते? हेलियम बलून म्हणजे काय? याप्रकारचे उपग्रहाचे बाहेरील कवच कुठल्या वस्तूंचा वापर करून बनवितात? या उपग्रहात अभ्यासासाठी कुठले सेंसर असतात? कुठले सॉफ्टवेअर वापरायचे? अशी सर्व माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी 6 ऑनलाईन सेशन घेतले जातील आणि 1 सेशन प्रत्‍यक्ष उपग्रह बनविण्‍याची कार्यशाळा असेल.
नागपुरात होणार प्रशिक्षण कार्यशाळा
विदर्भातील मुलांचा वाढता सहभाग बघता ही प्रशिक्षण कार्यशाळा नागपुरातच 18 ते 22 जानेवारी दरम्‍यान होणार आहे. नागपुरात डॉ. विशाल लिचडे, सॉफ्टसेन्‍स टेक्‍नोसर्व (इंडिया) प्रा. लि., नागपूर नागरिक सहकारी बँकेच्‍यावर, टेम्‍पल बझार रोड, सीताबर्डी, नागपूर येथे होईल.
या उपग्रहात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी नागपूर विभागाकरिता डॉ विशाल लिचडे (८२३७७३२८००), तुमसरसाठी दामोदर डहाळे (९६५७६७९९९७) , भंडारासाठी सहासराम बनसोड (७५०७५४११३३) यांचेशी संपर्क साधावा.
पत्रकार परिषदेला डॉ. विशाल लिचडे आणि मनिषा चौधरी यांची उपस्थिती होती.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.