प्राधान्यक्रम ठरवून योजनांचे प्रस्ताव सादर करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
· औरंगाबाद जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा
· ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ची जाणीव पावलागणिक जपावी
· शहरातील पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास नेणार
· नैसर्गिक साधनसंपत्ती, पर्यावरणाचे जतन करून विकास साधा
औरंगाबाद, : नागरिकांना केंद्रबिंदू ठेऊन योजना राबविण्याचे निर्देशित करत औरंगाबाद जिल्ह्यातील विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्याच्या विविध विकासकामांसंदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी उद्योग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई,रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळामध्ये यंत्रणांनी कौतुकास्पद कार्य केलेले आहे. या संकटावर यंत्रणेच्या पुढाकाराने मात करणे शक्य झाले. शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेस मोठ्याप्रमाणात राज्यात प्रतिसाद मिळाला.
औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिन्यावर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ची लावण्यात आलेले स्टीकर्स या माध्यमातून मोठ्याप्रमाणात जनजागृती होण्यास हातभार लागला आहे. अशाच प्रकारचा उपक्रम राज्यभर राबविण्यात यावा, अशी अपेक्षा श्री. ठाकरे यांनी व्यक्त केली.