सोमवारी प्राप्त होणार सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

Share This News

नवी दिल्ली,  2 मे 

प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत   सोमवार  3 मे रोजी   प्रथितयश बहुभाषी अभिनेते आणि बहुमुखी कलाकार  सुपरस्टार  रजनीकांत यांना 2019  वर्षाचा 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त होणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबरोबर हा पुरस्कार प्रदान केला जाईल. मागील महिन्यात 1 एप्रिल रोजी  केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी जाहीर केले.  2019 साठीचा पुरस्कार दिग्गज अभिनेते  रजनीकांत यांना प्रदान करण्यात येणार आहे.

या संदर्भात  ट्वीटरद्वारे  अधिकृत घोषणा  करताना  प्रकाश जावडेकर म्हणाले  होते,  “अत्यंत आनंदाची बाब आहे की, यंदाचा  दादासाहेब फाळके पुरस्कार भारतीय चित्रपट सृष्टीतील महान अभिनेते  रजनीकांत जी यांना प्रदान करण्यात येत आहे.  अभिनेता, निर्माता आणि पटकथाकार म्हणून  सुपरस्टार  रजनीकांत यांचे योगदान मोठे आणि दिशादर्शक आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार  समितीचे सदस्य आशा भोसले, सुभाष घई, मोहनलाल, शंकर महादेवन आणि बिश्वजीत चॅटर्जी यांचे धन्यवाद.”

12 डिसेंबर 1950 साली रजनीकांत यांचा जन्म बंगळूरू येथे एका मराठी कुटुंबात झाला. चित्रपटात येण्यापूर्वी शिवाजी राव गायकवाड यांनी कुटुंबास आर्थिक सहकार्य करण्यासाठी बस कंडक्टर, कार्पेंटर आणि अन्य अनेक कामे केलीत. शिवाजी राव गायकवाड पासून सुपरस्टार रजनीकांत हा प्रवास एखाद्या अद्भुत चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. बंगळूरू मध्ये  कर्नाटक परिवहन मंडळात बस कंडक्टर म्हणून कार्यरत असताना शिवाजी राव गायकवाड यांनी नाटकात काम करण्याची आवड जोपासायला सुरवात केली. त्यांनी अनेक कन्नड नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर मित्रांच्या प्रोत्साहनाने ते चेन्नईत चित्रपटाच्या शिक्षणासाठी गेले.

शिवाजी राव गायकवाड यांना  पुट्ट्णा कानगल यांच्या कथा संगमा या कन्नड चित्रपटाद्वारे पहिली संधी प्राप्त झाली. त्यानंतर प्रथितयश दिग्दर्शक के बालचंदर यांनी  शिवाजी राव गायकवाड यांच्यातील क्षमता ओळखत तमिळ शिकण्याचा सल्ला दिला तसेच 1975 साली अपूर्व रागंगल चित्रपटात एका कर्करोग ग्रस्त मनुष्याची भूमिका बजाविली. त्या चित्रपटाचे नायक कमल हसन आणि रजनीकांत पुढील काळात अत्यंत घनिष्ठ मित्र झाले. अपूर्व रागंगल चित्रपटानंतर शिवाजी राव गायकवाड यांचे रुपांतर रजनीकांत असे झाले आणि त्यांनतर जे झाले तो इतिहास आहे.

आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत रजनीकांत-थलैवा यांनी  कन्नड, तमिळ, तेलुगु, हिंदी, मल्याळम सहित बंगाली आणि इंग्रजी चित्रपटातही काम केले. 170 पेक्षा जास्त   चित्रपटात काम करून नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या सुपरस्टार रजनीकांत यांना पद्म भूषण आणि पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बहुभाषा कोविद रजनीकांत यांना मराठी, कन्नड, तमिळ, तेलुगु, हिंदी आणि इंग्रजीची उत्तम जाण आहे.

प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर  संपूर्ण भारत तसेच  विविध देशातून  सुपरस्टार  रजनीकांत यांना  शुभेच्छा आणि सदिच्छा संदेश प्राप्त  झाले. राष्ट्रपती, उपराष्ट्र्पती, पंतप्रधान, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री प्रथितयश राजकीय नेते, चित्रपट सृष्टीतील सहकारी, मित्र, हितचिंतक आणि संपूर्ण  जगातील चाहत्यांनी रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सुपरस्टार  रजनीकांत  यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद दिले. ट्वीटरद्वारे  आपल्या भावना व्यक्त करताना  रजनीकांत म्हणाले होते, ” मला प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केल्याबद्दल केंद्र सरकार, आदरणीय आणि प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रकाश जावडेकर आणि पुरस्कार समितीच्या सदस्यांना धन्यवाद. माझ्या प्रवासात सहभागी असणा-या सर्वांना हा पुरस्कार समर्पित करतो. भगवंताचे धन्यवाद.

मला प्रेम, शुभेच्छा आणि सदिच्छा प्राप्त झाल्या. प्रथितयश राजकीय नेते, चित्रपट सृष्टीतील माझे सहकारी, मित्र, हितचिंतक, माध्यमं,  भारत आणि संपूर्ण  जगातील चाहत्यांना आणि असे सर्व व्यक्ती ज्यांनी माझ्यासाठी वेळ काढून मला शुभेच्छा दिल्या त्यांना मनापासून धन्यवाद. मी आभारी आहे. “

2020 साली 9 जानेवारीला सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘दरबार ‘ चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला. दरबार नंतर सुपरस्टार रजनीकांत दिग्दर्शक  शिवा  यांच्यासोबत काम करीत आहे.  अन्नात्थे या चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर करणार आहे. याचित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत अनेक वर्षांनी अभिनेत्री मीना आणि खशबू सुंदर, नयनतारा, कीर्ती सुरेश काम करणार आहेत. अन्नात्थे चित्रपटाचे चित्रीकरण  सुरु झाले आहे. आरोग्य कारणामुळे रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय मागे घेतला.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.