विविध शाखेतील प्रवेश प्रक्रिया खोळंबल्या

Share This News

सरकारकडून अद्याप कुठलाही ठोस निर्णय नाही

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्यातील शैक्षणिक आरक्षणाचे गणित बिघडले आहे.  दोन महिन्यांपासून सरकारही यावर ठोस तोडगा काढू शकत नसल्याने राज्यातील अकरावी, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, स्थापत्य, व्यवस्थापन शास्त्रासह अनेक शाखांच्या प्रवेश प्रक्रिया खोळंबल्या आहेत. करोनामुळे आधीच शैक्षणिक वर्षांची घडी बिघडली आहे. त्यात पुन्हा प्रवेशप्रक्रियेला आरक्षणाचा फटका बसल्याने पालक, विद्यार्थ्यांकडून चिंता व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने टाळेबंदीच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. परंतु दहावी परीक्षा उत्तीर्ण होऊन अकरावीत गेलेले विद्यार्थी गेल्या आठ महिन्यांपासून शिक्षणापासून वंचित आहेत. अकरावीचे पहिले सत्र संपले तरी यंदा प्रवेशप्रक्रियाच सुरू झालेली नाही. अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यावर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबाबत कोणताही विचार शिक्षण विभागाने केलेला नाही.

प्रवेश घेताच विद्यार्थ्यांना अकरावीच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या परीक्षेनंतर पुन्हा बारावीचे वर्ष समोर आहे. पदवीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भात अद्याप सरकाकडून निर्णय झालेला नाही. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारने आरक्षणाच्या समर्थनार्थ आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, अद्याप यावर कोणतीही कार्यवाही  झालेली नाही.

१ डिसेंबरपासून वर्ग कसे सुरू होणार?

पदवी व्यावसायिक अभ्यासक्र मासाठी  एमएच-सीईटी परीक्षा  १ ते २० ऑक्टोबरदरम्यान राज्यातील विविध केंद्रांवर पार पडली. या परीक्षेचा निकाल नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात येण्याची शक्यता आहे. मात्र, दरवर्षी निकाल लागण्याआधी प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायची. अ. भा. तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई)अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षांचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, अद्याप प्रवेश प्रक्रियाच सुरू झाली नसल्याने वर्ग कसे सुरू करायचे, असा प्रश्न महाविद्यालयांसमोर आहे.

शिक्षण मंत्र्यांची घोषणा हवेतच

शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी अकरावी प्रवेशासंदर्भात महाधिवक्त्यांशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, दहा दिवसांचा अवधी लोटून यावर  निर्णय झालेला नाही.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.