मोदी साहेब ‘मन की बात’मधून चांगलं बोलतात, परंतु कृती काहीच करत नाहीत; सुप्रिया सुळेंची खोचक टीका
पंतप्रधान कार्यालयाचा फोन उचलला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. मोदीसाहेब ‘मन की बात’ मधून किंवा भाषणात चांगलं-चांगलं बोलतात. परंतु कृती काहीच करत नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाी. काहींच्यासाठी मोदींचे अश्रू निघतात परंतु माझ्या आंदोलन करणार्या शेतकऱ्यांसाठी निघत नाहीत यावरून मोदींचे अश्रू कुणासाठी आहेत हे लक्षात येते, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अंबरनाथ येथे कार्यकर्ता मेळाव्यात केला
कोव्हिड काळात खासदारांचा 12 कोटींचा निधी कापला. आम्ही कोव्हिड काळ असल्याने मान्यही केले. मात्र, मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीचे काम सुरु केले. तोच निधी एखाद्या हॉस्पिटल उभारणीसाठी वापरला असता, तर आम्हाला चांगलं वाटलं असतं. ज्याची गरज नसताना का हा उपद्व्याप असा सवाल करतानाच हे केंद्र सरकार असंवेदनशीलतेने चालत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.
अंबरनाथ भागातील रस्त्यांची अवस्था चांगली आहे कारण हे रस्ते आमचे सरकार असताना झाले आहेत. याअगोदर या देशात काहीच झालं नाही की कसली उभारणी झाली नाही जी सहा वर्षांत झाली असे केंद्र सरकार सांगत आहे. अंबरनाथ भागातील कंपन्या मागील पाच वर्षात बंद पडल्या परंतु नवीन कंपन्या आणण्याचा प्रयत्न केंद्रसरकारने केला नाही. केंद्र सरकारने कामगारांच्या विरोधात कायदा केला आहे. जो तुमच्या आमच्या मुलांच्या मुळावर उठणार आहे याची आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी करुन दिली.
पवारसाहेबांना ईडीची नोटीस आली आणि राज्यात गेमचेंज झाला. यावेळी महाराष्ट्रातील जनता साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला त्या जनतेचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी विशेष आभार यावेळी मानले शिवाय साताऱ्याच्या पावसातील सभेने महाराष्ट्राचे चित्र बदलले याची आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी करुन दिली.
पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षासोबत राहिला त्याचा मानसन्मान नक्कीच केला जाईल. राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन जो एकटा लढत होता त्याचाही मानसन्मान 100 टक्के करणार असा शब्द खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
या मेळाव्यात राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला .
अंबरनाथ कार्यकर्ता मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, माजी खासदार आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ,ठाणे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, महिलाध्यक्षा विद्या वैकांते शहराध्यक्ष सदाशिव पाटील, महिला शहराध्यक्षा पुनम शेलार आदींसह पक्षाचे नेते आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.