‘वीज कनेक्शन तोडणी’ला स्थगिती; अजित पवारांची विधानसभेत घोषणा Suspension of ‘power connection disconnection’; Ajit Pawar’s announcement in the assembly
मुंबई,दि.02- करोना काळात पाठवण्यात आलेल्या वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून सभागृहात आज गोंधळ उडाला. विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावरून भाजपा आक्रमक झाली. सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचे आभार मानले.
सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपा आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. वाढीव बिलासंदर्भातील फलक झळकावत भाजपानं या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधून घेतलं. सर्वसामान्य नागरिकांच्या वीज कनेक्शनसह कृषी पंपाची वीज तोडण्याची कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी भाजपानं केली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला.
वाढीव वीज बिल मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चर्चा घेण्याची मागणी केली. “राज्यात वीज कनेक्शन कापली जात आहेत. करोनामुळे संकटात आलेल्या नागरिकांना अडचणीत आणलं जात आहे,” असं फडणवीस म्हणाले. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले,”राज्य सरकारच्या वतीने मी सांगू इच्छितो की, जोपर्यंत ऊर्जा विभागाची वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे वीज कनेक्शन तोडणं थांबण्यात येईल. आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी, अशी सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांची इच्छा आहे. त्यामुळे एक दिवस ठरवून चर्चा करू. चर्चेतून सगळ्या सदस्यांचं समाधान झाल्यानंतर वीज बिलाच्या मुद्द्यासंबंधातील निर्णय घेण्यात येतील,” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.अजित पवारांनी वीज कनेक्शन तोडणी थांबवण्याची घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि सरकारचे आभार मानले. फडणवीस म्हणाले,”अतिशय योग्य निर्णयाची घोषणा केली, त्याबद्दल मी अजित पवार यांचे आभार मानतो. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, जोपर्यंत यासंदर्भात निर्णय होत नाही, तोपर्यंत कुणाचीही वीज तोडण्यात येणार नाही. याबद्दल सरकारचे आभार मानतो. ज्यांची वीज तोडली, त्यांच्या जोडून द्या. त्यांनाही समान न्याय द्या, अशी माझी विनंती आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.