महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक ऑफलाईन सभेत घ्या Take the election for the post of Mayor and Deputy Mayor in an offline meeting
नागपूर : नागपूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची नियोजित ऑफलाईन निवडणूक रद्द करून ती ऑनलाईन घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. महासभेत शहरातील अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा होणे अपेक्षित होते. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी ५ जानेवारी २०२१ रोजी होणारी महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक आणि सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीनेच घ्या, अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे. महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीकरिता सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने न घेता ऑनलाईन घेणे व सर्वसाधारण सभा घ्यायचे टाळणे हे प्रशासन व राज्य सरकारचे संगनमत आहे. सूडाचे राजकारण जनतेपुढे येऊ नये यासाठी राज्य सरकार ऑनलाईन सभांचा पायंडा पाडण्याचे कारस्थान करीत आहे. एकिकडे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पत्रान्वये जिल्हा नियोजन समितीची सभा ११ जानेवारी २०२१ ला डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. मात्र भाजपची सत्ता असलेल्या नागपूर मनपाची सभा प्रत्यक्षरीत्या घेण्यापासून थांबविण्याचे कारस्थान महाविकास आघाडी सरकार करत आहे, असा आरोपही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे. मनपाच्या ऑनलाईन सभेमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा टाळली जाईल. राज्य शासनाकडून मनपाला दरवर्षी मिळणाऱ्या निधीला यावर्षी कात्री लावली आहे. कार्यादेश झालेली विकास कामे थांबवली आहेत. सरकार लोकप्रतिनिधींच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळत आहे. वास्तविक कोविड संदर्भातील सर्व दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करून सभा घेता आली असती असा आरोप त्यांनी केला आहे.