ठाणे : नगरसेवक निधीवर कात्री नको : नारायण पवार

Share This News

ठाणे, दि. ६ नोव्हेंबर : ठाणे शहरातील नागरिकांसाठी आवश्यक व तत्काळ गरजेची विकासकामे करण्यासाठी नगरसेवक निधी व प्रभाग सुधारणा निधीवर कात्री चालवू नये, अशी आग्रही मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या दोन्ही निधींसाठी १७६ कोटी ४६ लाखांची तरतूद आवश्यक असल्यामुळे महापालिकेने कपात न करण्याबरोबरच संबंधित कामांचा `फिल्ड वर्क’मध्ये समावेश करू नये, अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे. 
महापालिका क्षेत्रात प्रभाग सुधारणा निधी व नगरसेवक निधीतील कामे निधीच्या उपलब्धतेप्रमाणे हाती घेण्याचा आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी काढला आहे. नगरसेवक निधी व प्रभाग सुधारणा निधीतून नागरिकांसाठी आवश्यक असलेली तातडीची कामे केली जातात. सर्वच प्रभागांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती दयनीय झाली आहे. प्रभागातील रस्ते, पायवाटा, फूटपाथ आणि गटारांची दुरवस्था झाली आहे. फूटपाथवरील चेंबर्स तुटल्यामुळे अपघातांची भीती आहे. त्यातच मार्च महिन्यापासून विकासकामे बंद असल्यामुळे रस्ते, गटार, फूटपाथ, पायवाटा आदींच्या दुरुस्तीची गरज आहे. त्याचबरोबर अन्य किरकोळ कामांसाठीही निधीची आवश्यकता भासते, याकडे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे. `कोरोना’च्या आपत्तीमुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला असला, तरी आताही महापालिकेकडून मोठ्या खर्चाची अनेक कामे हाती घेतली जात आहेत. मात्र, नगरसेवक निधी व प्रभाग सुधारणा निधीवर चालविण्यात येणारी कात्री अन्यायकारक आहे, असे मत ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केले. अर्थसंकल्पातील तरतूदीनुसार स्थायी समितीने प्रभाग सुधारणा निधीसाठी १३० कोटी रुपये व नगरसेवक निधीसाठी सुमारे ४६ कोटी ४६ लाख रुपयांच्या निधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. महापालिकेतील १३४ नगरसेवकांनुसार नगरसेवक निधीची विभागणी केल्यास प्रत्येक नगरसेवकाला सुमारे ३४ लाख ६७ हजार रुपयांची विकासकामे सुचविता येणार आहेत. प्रभागांमधील अत्यावश्यक कामांची संख्या लक्षात घेता हा निधी अपुरा पडण्याची दाट शक्यता आहे. त्यात महापालिका प्रशासनाने आणखी कपात केल्यास प्रभागातील अत्यावश्यक कामे रखडणार आहेत. त्यामुळे स्थायी समितीनेच मंजूर केलेला नगरसेवक निधी व प्रभाग सुधारणा निधी प्रदान करावा. तसेच या कामांचा फिल्ड वर्कमध्ये समावेश करू नये, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.