11 वी बैठकही निष्फळ, हा तर शेतकऱ्यांचा अपमानच; सरकारचा कायदे स्थगितीचा प्रस्ताव शेतकऱ्यांना अमान्य
शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील 11 वी बैठकही निष्फळ ठरली असून, यावेळी केवळ 20 मिनिटे चर्चा झाल्याचे वृत्त आहे. कृषी कायदे दीड ते दोन वर्षांपर्यंत स्थगित ठेवण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी सपशेल धुडकाविला. दरम्यान सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. आंदोलन आणखी तीव्र करणार असून प्रजासत्ताकदिनी ट्रक्टर मोर्चा काढणारच असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, वाणिज्यमंत्री पियूष गोयल, राज्यमंत्री सोमप्रकाश आणि शेतकरी संघटनांचे 41 नेते यांच्यात विज्ञान भवनात बैठक झाली. केवळ 20 मिनिटे समोरासमोर चर्चा झाली.
लंचब्रेक घेण्यात आला. तब्बल साडेतीन तास शेतकरी नेते आपसात चर्चा करीत होते. मंत्रीही एकमेकांशी चर्चा करताना दिसत होते.
मंत्र्यांनी साडेतीन तास वाट पहायला लावली. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. आमचे शांततापूर्ण आंदोलन यापुढेही सुरूच राहणार असा इशारा किसान मजदूर संघर्ष समितीचे श्रवणसिंह पंढेर यांनी दिला आहे.