चक्क खातेदारांच्या खात्यातून रक्कम गायब
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा घोटाळा समोर आला असता दिवसागणिक यात धक्कादायक खुलासे होत आहेत. आज या संदर्भात शेकडो खातेदारांनी बँकेच्या शाखेत धडक दिली असता त्यांच्या खात्यातून रक्कम गायब झाली असल्याचे समोर आले.
जनता शासकीय-निमशासकीय संस्थेने जिल्हा परिषदेच्या समोर असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेतील रक्कम गहाळ झाली असल्याची तक्रार केली असता ह्या घोटाळ्याचे बिंग फुटले. रोखपाल निखिल घाटे याने अशा अनेक संस्थांचे पैसे लाटून जवळपास दीड कोटींचा अपहार केल्याचे निदर्शनास आले होते. मात्र हे हा घोटाळा जवळपास दहा कोटींचा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज बँके उघडली असता बँकेच्या खातेदारांची येथे अक्षरशः झुंबड उडाली. अनेकांच्या खात्यातून रक्कम लंपास झाली असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये पोलिसांना देखील सोडले नाही. जिल्हा पोलिस सहकारी पतसंस्था यांचे 11 लाख तर चंद्रपूर महानगरपालिकेच्या खात्यातील 9 लाख रुपये गहाळ केल्याचेही निदर्शनास आले. गरीब शेतकऱ्यांच्या घामाने कामविलेल्या पैशांनाही सोडले नाही. कुणाच्या खात्यातून दोन लाख, कुणाच्या खात्यातुन पाच लाख रक्कम गहाळ आहे.
ज्यांनी आयुष्यभर पै न पै गोळा करून पैसे गोळा केले, अश्या लोकांसमोर जगावे की मरावे असा पेच निर्माण झाला आहे. एकटा रोखपाल हे करणे शक्य नाही. यात बँकेचे काही अधिकारी आणि सत्ताधारी संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. अन्यथा हा प्रकार कधीच बाहेर आला असता. जेव्हा हा घोटाळा समोर आला तेव्हा देखील संचालक मंडळाचे सदस्य सारवासारवच करण्याचे काम करीत होते. आपली पत वाचविण्यासाठी बँकेने रामनगर पोलीस ठाण्यात थातुरमातुर तक्रार दिली. मात्र, प्रसिद्धीमाध्यमामध्ये बातम्या प्रकाशित होताच अखेर यात भादवी कलम 409 चा म्हणजे गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात सध्या तपास सुरू आहे.