राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लागलेय राजकीय वर्तुळाचे लक्ष The attention of the political circles is focused on the role of the NCP

Share This News

नागपूर: संजय राठोड यांचा राजीनामा, मनसुख हिरेन मृत्यू आणि अँटीलिया स्फोटक प्रकरण तसेच सचिन वाझे यांच्यावरील अटकेच्या कारवाईमुळे राज्यातील आघाडी सरकारला एकापाठोपाठ धक्के बसत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली असल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प. बंगालमध्ये भाजपच्या विरोधात सर्वपक्षीय मोट बांधण्याचे प्रयत्न करून पाहिले. त्याला काँग्रेसने दाद दिली नाही. काँग्रेसने डाव्यांना जवळ करून स्वतंत्र आघाडीचा निर्णय घेतला. त्यामुळे नाराज झालेल्या पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय जाहीर करत काँग्रेसला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने ममता बॅनर्जी यांना कुठलाच राजकीय फायदा होणार नसला तरी यानिमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील विसंवाद पुन्हा एकदा उघड झाला आहे. अशातच सोमवारी पवार यांनी राज्यातील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची स्वतंत्र बैठक बोलावली आहे. पवार यांनी ही बैठक नेमकी कशासाठी बोलावली, यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत.
मागील महिनाभरात राज्यातील राजकारण धनंजय मुंडे प्रकरण, संजय राठोड राजीनामा, अँटीलिया स्फोटके प्रकरण, मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू आणि पोलिस अधिकारी सचिन वाझे अटक प्रकरणाने ढवळून निघाले आहे. एकापाठोपाठ बसत असलेल्या या धक्क्यांमुळे महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष अस्वस्थ झाले आहेत. आगामी काळात हे धक्के आणखी तीव्र स्वरुपाचे असतील, असा कयास राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात लावला जात आहे. संजय राठोड प्रकरणासह अँटीलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणामुळे सरकारच्या प्रतिमेला तडा गेल्याची भावना राष्ट्रवादीच्या गोटात व्यक्त होत आहे. सचिन वाझे प्रकरणात भाजप-शिवसेना या दोन पक्षांमध्ये मुदतपूर्व धुळवड साजरी होत असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावर कमालीचे मौन बाळगत जाणीवपूर्वक स्वतःला दूर ठेवले आहे. खरे तर संकटाच्या काळात आघाडीत एकोप्याची भावना वाढीस लागून ती व्यक्त होणे अपेक्षित होते. मात्र, दोन्ही पक्षांनी कुंपणावर बसून बघ्याची घेतलेली भूमिका शिवसेनेला अस्वस्थ करणारी ठरते आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. पक्षाच्या सोमवारच्या बैठकीतून काही संकेत मिळू शकतील, असेही जाणकारांना वाटते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.