अपूर्णतेतील सौंदर्य

Share This News

माझ्या बागेतल्या एका वेलीच्या पानांना छिद्रं आहेत. म्हणजे निसर्गतःच ती वेल तशी आहे. दुपारचं ऊन पडलं आणि पानांची सावली खाली जमिनीवर पडली. त्या पानांच्या छिद्रातून ऊन आरपार गेलं होतं आणि जमिनीवर उठली होती पानांची सुंदर नक्षी! वाटलं काही गोष्टी अपूर्ण असण्यातच त्यांचं सौंदर्य सामावलेलं असतं. अपूर्णतेतील सौंदर्य!

विनोबा भावे आपले काव्य विषयक विचार मांडताना म्हणतात की काव्यनिर्मिती ही एखाद्या अपरिपक्व विचारातून होते. म्हणजे काव्य ही एक (raw) कच्ची गोष्ट असते. एखादी गोष्ट आपल्या मनात सतत घोळत असते, रुंजी घालत असते त्यावेळीच ती काव्यरूप घेते. विचारमंथन पूर्ण झालं तर त्यात काव्य उरत नाही. एखाद्या गोष्टीचा अपूर्ण उलगडा काव्याला जन्म देतो. आणि काव्य म्हणजेही सौंदर्य. अगदी दुःख सुद्धा काव्यामध्ये सुंदर होऊन उतरतं. सुखाला अपूर्ण ठेवतं ते दुःख ; आणि दुःख आहे आयुष्यात म्हणूनच सुखाला अर्थ आहे. म्हणजेच दुःखातही सौंदर्य सामावलेलं आहे.

संसार ही अशीच एक अपूर्ण गोष्ट आहे. या जगात कोणीही कोणत्याही बाबतीत परिपूर्ण असा जन्मलेलाच नाही. प्रत्येकामध्ये काहीनाकाही उणीवा या असतातच. परिपूर्ण असा एकच, आणि तो म्हणजे परमेश्वर. परमेश्वराने प्रत्येक जीवला अपूर्ण ठेवलं आहे या मागेही त्याची योजनाच आहे कारण या अपूर्णतेमुळे हा सृष्टीचा संसार ‘चल’ आहे. माणसाच्या असंख्य गरजा पूर्ती साठी आयुष्यभर चालणारी धडपड असो किंवा शारीरिक सुखातून क्षणिक मिळणारी तृप्ती असो, पूर्वापार चालत आलेली ही पूर्णतेसाठीची धडपड संसाराला सौंदर्य देते.

हिंदुधर्ममध्ये मृत्यूनंतर होणाऱ्या श्राद्धादिक गोष्टींमागेही कारणं आहेत. मोक्षाला प्राप्त केलेल्या दिव्यात्माची श्राद्ध घातली जात नसतात. श्राद्ध होतात सामान्य माणसांची. कारण अपूर्ण राहिलेल्या इच्छा आत्म्याला पुढे जाऊ देत नाहीत. मृत्यूवेळी अपूर्ण इच्छा राहिली असेल, तर म्हणतात पिंडाला कावळा शिवत नाही. जी माणसं आयुष्याला कंटाळलेली असतात वा जे समाधानी असतात; करण इच्छा या न संपणाऱ्या असतात, अशांनाच मृत्यूची प्रतीक्षा असते. अपूर्णता खरंतर एक (process) प्रक्रिया आहे, तसंच मृत्यूची प्रतीक्षा सुद्धा एक प्रक्रिया आहे, पूर्णत्त्वाकडे जाण्यासाठी शरीर केवळ एक साधन आहे. साध्या इतकंच साधन सुद्धा महत्त्वाचं असतं. सिद्ध व्यक्तींना शरीरात राहूनच पूर्णत्वाचं भान असतं, आणि संसारातील सौंदर्य अशांना पुरतं कळलेलं असतं, कारण प्रवाहाचं सौंदर्य प्रत्यक्ष प्रवाहापेक्षा काठावरच्या माणसांना अधिक कळतं.

ॐ पूर्णमदः पूर्णमिदम्
पूर्णात् पूर्णमुदच्यते |
पूर्णस्य पूर्णमादाय
​पूर्णमेवावशिष्यते ||
​ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः

हा इशावास्योपनिषदतील शांतिमंत्र हेच सांगतो. एका पूर्णातून दुसरा पूर्ण वजा केला तर वजाबाकी पूर्णच राहते. पुर्ततेतून जी तृप्ती मिळते त्या तृप्तीसाठी धडपड ही सुरूच असते. पण नक्की सुख कशात आहे बऱ्याचदा उलगडतच नाही. अपूर्णता हा एक ‘आभास’ आहे. आणि आपण सगळेच या आभासी जगात जगतोय. आपल्या पूर्ण स्वरूपाची जाणीव सहज झाली असती तर आयुष्याला अर्थच उरला नसता.

-अश्विनी जांभेकर पितळे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.