यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातून २५ वर्षीय रुग्णाचा मृतदेह गायब

Share This News

यवतमाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह ४८ तासानंतरही त्याच्या नातेवाईकास मिळालेला नाही. रोशन भीमराव ढोकणे (२५) रा. पिपळगाव काळे ता. नेर असे मृत युवकाचे नाव आहे. गेल्या ४८ तासांपासून त्याचा मृतदेह मेडिकलमधून बेपत्ता असल्याने नातेवाईक हवालदिल झाले आहेत. पोलिसांनीही बुधवारी या घटनेची तक्रार घेण्याऐवजी आधी शोध घ्या नंतर बघू,असा सल्ला दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
रोशनला मंगळवारी सकाळी पोटदुखीच्या असह्य त्रासामुळे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दिवसभर फिवर ओपीडीत ठेवण्यात आल्यानंतर सायंकाळी वॉर्ड क्र. २५ मध्ये हलविण्यात आले. तेथे रात्री ८ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी मृतदेहाची खातरजमा करून ते गावी निघून गेले. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदनगृहातून त्यांना मृतदेह मिळेल असे सांगण्यात आले. मात्र दोन दिवसांपासून रोशनचे नातेवाईक त्याचा मृतदेह शोधत असून, तो अद्यापही सापडला नाही. या संदर्भात मेडिकल प्रशासनाला विचारणा केली असता सदर युवकाचा मृतदेह वॉर्डात होता व तो शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आला, मात्र संबंधित वॉर्डातील प्रभारींनी अधिष्ठातांना चुकीची माहिती दिल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित वॉर्ड इनचार्जवर प्रशासन काय कारवाई करणार, हा प्रश्न आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात दररोज सरासरी ३० ते ४० रुग्णांचा मृत्यू होत आहे. करोनाबाधितांचा मृतदेह नेताना रोशनचा मृतदेह चुकीने नेण्यात येऊन त्याच्यावर अंत्यसंस्कारही झाले असण्याची शक्यता आहे. येथील शवविच्छेदनगृहात एका मध्यमवयीन अनोळखी पुरुषाचा मृतदेह दोन दिवसांपासून ठेवलेला आहे. त्याची ओळख अद्यापही पटलेली नाही. त्यामुळे कुणीतरी चुकून रोशनचा मृतदेह घेऊन गेले आणि हा मृतदेह तसाच राहिला असण्याची शक्यता आहे. या मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.